जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मायाबाई फरसे ही एक मोलमजुरी करणारी विवाहिता होती. पापड तयार करण्याच्या कारखान्यात जाऊन ती आपल्या संसाराला हातभार लावत होती. तिचा पती दिलीप फरसे हा देखील आपल्या मुलाचे भवितव्य साकारण्यासह संसाराचा गाडा चालवण्यासाठी प्लायवूडच्या दुकानात कामाला जात होता. एकंदरीत फरसे दाम्पत्य एक मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारे दाम्पत्य होते.
मायाबाई दररोज दुपारी दीड वाजता पापड तयार करण्यासाठी घराबाहेर जात असे व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुन्हा घरी परत येत होती. घरी आल्यावर ती स्वयंपाक व घरातील कामात स्वतःला वाहून घेत होती. असा एकंदरीत तिचा दिनक्रम सुरु होता.
फरसे दाम्पत्य रहात असलेल्या परिसरात अमोल रतनसिंग दांडगे हा तरुण रहात होता. नात्याने तो दिलीप आणि मायाबाई फरसे या दाम्पत्याचा भाचा लागत होता. काहीही कामधंदा करत नसलेल्या अमोल सोबत फरसे दाम्पत्याचा फार काही संबंध नव्हता. अमोल हा लांबच्या नात्याने त्यांचा भाचा लागत होता. सुमारे दीड वर्षांपूर्वी अमोल दांडगे याची आई वारली होती. तेव्हापासून तो मायाबाई आणि दिलीप या दाम्पत्याकडे मोठ्या प्रमाणात येऊ लागला. आल्यानंतर तो नात्याने मामी लागत असलेल्या मायाबाई सोबत देवाधर्माच्या गोष्टी करत असे. मायाबाईला देवाधर्माच्या गोष्टी सांगून त्याने आपुलकी निर्माण केली होती. धार्मिक मनोवृत्तीच्या महिलांना देवाधर्माच्या गोष्टी कथन केल्याने त्या आपल्यावर विश्वास ठेवतात हे अमोलने ओळखून घेतले होते. त्यामुळे तो मायाबाईसोबत कायम धार्मिक विषयावर चर्चा करत होता.
मायाबाईचा भाचा अमोल हा काही दिवसांनी त्याचा मित्र संतोष रामकृष्ण मुळीक (रा. शिवाजीनगर जळगाव) याला देखील सोबत आणू लागला. संतोष मुळीक हा मांत्रिकाचे काम करत होता. तंत्र मंत्र विद्येचा तो वापर करत असल्याचे म्हटले जाते.
15 डिसेंबर रोजी दिलीप आणि मायाबाई हे पती पत्नी घरीच होते. त्यांचा मुलगा विजय हा मुंबई येथे मित्रांसोबत गेलेला होता. या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी साडे नऊ वाजता दिलीप फरसे हे आपल्या कामावर गेले. काम आटोपून रात्री साडे आठ वाजता परत आल्यावर त्यांना घरी दरवाजाला कुलूप दिसून आले. त्यामुळे आजूबाजूला, शेजारीपाजारी त्यांनी पत्नी मायाबाईची विचारपूस केली. त्यावेळी त्यांना समजले की त्यांची पत्नी मायाबाई ही दुपारी दोन वाजता भाचा अमोल सोबत गेली आहे. त्यामुळे त्यांनी बराच वेळ पत्नी मायाबाई परत येण्याची वाट पाहिली. मात्र मायाबाई घरी परत आलीच नाही. रात्र झाली असल्यामुळे अगोदरच भुकेने व्याकुळ झालेल्या दिलीप फरसे यांनी तगमग करत सर्व नातेवाईकांकडे मायाबाईची चौकशी केली. मात्र कुठेही त्यांना मायाबाईचा तपास लागला नाही.
भाचा अमोल दांडगे याच्या घरी जाऊन त्याला विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने सांगितले की, मला बाजारात जायचे असल्याने मी मामीला शिवाजीनगर स्मशानभुमीच्या कोप-यावर सोडले व पुढे एकटाच बाजारात निघुन गेलो. अखेर उद्विग्न होत दिलीप फरसे यांनी घरी येत दरवाजाचे कुलूप तोडले. कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यावर त्यांना घरातील माळयावर असलेली लोखंडी पेटी दिसली नाही. या पेटीत सोन्याच्या चार अंगठया होत्या. त्यापैकी तीन अंगठ्या 3 ग्रॅम व एक 15 ग्रॅम वजनाची होती. याशिवाय मायाबाईच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत, चांदीचे पाच शिक्के, चांदीच्या साखळ्यांचा जोड, 3 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, सव्वा ग्रॅम सोन्याची रिंग, सव्वा ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट असा एकुण एक लाख रुपये किमतीचा सोने चांदीचा ऐवज त्या पेटीत होता. ती पेटी गायब असल्याचे दिलीप फरसे यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. भुकेने आणि मनाने कासावीस झालेल्या दिलीप फरसे यांनी या घटनेची माहीती मुंबई येथे गेलेल्या मुलास फोनवर कळवली. सकाळपर्यंत मी जळगावला परत येतो असे म्हणत मुलाने त्यांना धीर राखण्यास सांगितले.
दुस-या दिवशी 16 डिसेंबर रोजी देखील त्यांची पत्नी मायाबाई घरी परत आलेली नव्हती. अखेर त्यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशन गाठले. पत्नी घरातून निघून गेल्याबाबत त्यांनी मिसिंग दाखल केली. मुलगा विजय याने त्यांना धीर देत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोधून काढले. अण्णा नावाच्या इसमाच्या घरावर लावलेल्या कॅमे-यात दिलीप आणि विजय या पितापुत्रांना मायाबाई आणि अमोल हे दोघे रस्त्याने पायी जातांना आढळून आले. संशयाची पाल चुकचुकल्याने त्यांनी अमोल यास मायाबाईबद्दल पुन्हा पुन्हा विचारणा केली. मी मामी मायाबाईस स्मशानभुमीच्या कोप-यावर सोडले होते एवढीच माहिती ती देत राहिला. त्यानंतर संधी साधत अमोल कोठेतरी बाहेरगावी निघून गेला. त्याच्यावर फरसे पितापुत्राचा संशय असल्यामुळे त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले होते. तो जळगावला परत आल्याचे समजताच त्यांनी त्याला ताब्यात घेत शहर पोलीस स्टेशनला आणले.
पोलीसांनी त्याची सखोल स्वरुपात विचारपूस केली असता त्याने माहिती देण्यास सुरुवात केली. त्याने काहीतरी महत्वाची माहिती दिल्यानंतर याबाबत पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांना कळवण्यात आले. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यास सोबत घेत तो सांगत असलेल्या विदगांव शिवारात नेण्यात आले.
विदगांव शिवारातील तापी नदीच्या बाजुला असलेल्या जंगलातील नाल्यात मायाबाईचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला.
या प्रकरणी अधिक तपास व चौकशीत अमोल याने त्याचा मांत्रिक साथीदार संतोष रामकृष्ण मुळीक याला देखील ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी मायाबाईच्या मृतदेहासह घटनास्थळ पंचनामा पूर्ण केला. मायाबाईच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
मायाबाई हिच्या अंगावरील व घरातील दागीने चोरुन नेण्यासह तिला विदगांव शिवारातील जंगलात नेऊन ठार करुन तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या संशयातून अमोल रतनसिंग दांडगे (रा. शिवाजीनगर जळगाव) याच्या विरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित म्हणून अमोल रतनसिंग दांडगे व त्याचा साथीदार संतोष रामकृष्ण मुळीक या दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. घटनेचे वृत्त लिहीत असेपर्यंत दोघांच्या अटकेची पूर्तता झालेली नव्हती.