जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : जळगाव येथील गाजत असलेल्या मायाबाई फरसे या महिलेच्या निर्घृण हत्येचा तपास जळगाव शहर पोलिसांनी यशस्वीपणे लावला आहे. या प्रकरणी सर्व घटनाक्रम समोर आला आहे.
मायाबाई फरसे ही एक मोलमजुरी करणारी विवाहिता होती. पापड तयार करण्याच्या कारखान्यात जाऊन ती आपल्या संसाराला हातभार लावत होती. तिचा पती दिलीप फरसे हा देखील आपल्या मुलाचे भवितव्य साकारण्यासह संसाराचा गाडा चालवण्यासाठी प्लायवूडच्या दुकानात कामाला जात होता. एकंदरीत फरसे दाम्पत्य एक मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणारे दाम्पत्य होते.
मायाबाई दररोज दुपारी दीड वाजता पापड तयार करण्यासाठी घराबाहेर जात असे व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुन्हा घरी परत येत होती. घरी आल्यावर ती स्वयंपाक व घरातील कामात स्वतःला वाहून घेत होती. असा एकंदरीत तिचा दिनक्रम सुरु होता. फरसे दाम्पत्य रहात असलेल्या परिसरात अमोल रतनसिंग दांडगे हा तरुण रहात होता. नात्याने तो मायाबाईचा भाचा लागत होता. काहीही कामधंदा करत नसलेल्या अमोल सोबत फरसे दाम्पत्याचा फार काही संबंध नव्हता. अमोल हा लांबच्या नात्याने त्यांचा भाचा लागत होता. सुमारे दीड वर्षांपूर्वी अमोल दांडगे याची आई वारली होती. तेव्हापासून तो मायाबाई आणि दिलीप या दाम्पत्याकडे मोठ्या प्रमाणात येऊ लागला. आल्यानंतर तो नात्याने मामी लागत असलेल्या मायाबाई सोबत देवाधर्माच्या गोष्टी करत असे. मायाबाईला देवाधर्माच्या गोष्टी सांगून त्याने आपुलकी निर्माण केली होती. धार्मिक मनोवृत्तीच्या महिलांना देवाधर्माच्या गोष्टी कथन केल्याने त्या आपल्यावर विश्वास ठेवतात हे अमोलने ओळखून घेतले होते. त्यामुळे तो मायाबाईसोबत कायम धार्मिक विषयावर चर्चा करत होता. मायाबाईचा भाचा अमोल हा काही दिवसांनी त्याचा मित्र संतोष रामकृष्ण मुळीक (रा. शिवाजीनगर जळगाव) याला देखील सोबत आणू लागला. संतोष मुळीक हा मांत्रिकाचे काम करत होता. तंत्र मंत्र विद्येचा तो वापर करत असल्याचे म्हटले जाते.
अमोल दांडगे आणि तंत्रमंत्र विद्येचा वापर करणारा त्याचा मित्र संतोष मुळीक या दोघांचे मायाबाईकडे जाणे येणे सुरु होते. मायाबाईकडे सोन्याचे दागिने ठेवलेला एक डबा असल्याची माहिती या दोघांना समजली होती. जवळपास एक लाख रकमेचे सोन्याचे दागिने हडप करण्याचा कुविचार दोघांच्या मनात चमकून गेला.आपली मामी मायाबाई धार्मिक मनोवृत्तीची असल्याचा गैरफायदा अमोल दांडगे याने मांत्रिक साथीदार संतोष मुळीक यांच्या मदतीने घेण्याचे ठरवले होते. मायाबाईचा पती कामावर गेल्यावर हे दोघे जण तिला धार्मिक गोष्टी सांगून वश करत होते. तिच्या घरातच दोघांनी पूजापाठ करत तिला एकेदिवशी वश करत काहीप्रमाणात तिची मती गुंग केली. अल्प प्रमाणात भान हरपलेल्या मायाबाईकडून त्यांनी सोन्याचांदीचे दागिने असलेला डबा हस्तगत केला.
सोन्या चांदीचे दागिने असलेला डबा हाती येताच अमोलने तो डबा अगोदर मांत्रिक मुळीककडे आणला. त्यानंतर दोघांनी त्या डब्यातील सोन्याचे दागिने काढून घेत रिकामा डबा सुप्रीम कॉलनी भागातील निर्जन स्थळी फेकून दिला. त्यानंतर दोघे आपल्या आपल्या घरी परतले. अमोलने ते दागिने एका सराफाला विकून टाकले. दरम्यान या प्रकाराची भनक देखील मायाबाईच्या पतीला लागली नव्हती.
काही दिवसांनी भानावर आल्यावर मायाबाईने आपल्या दागिन्यांची मागणी सुरु केली. पूजाविधी पूर्ण करुन दागिने देतो अशी बोळवण अमोल तिला करु लागला. दागिने लंपास झाल्याचे आपल्या पतीला समजले तर घरात वाद होतील याची कल्पना मायाबाईला आली होती. त्यामुळे ती अमोलकडे दागिन्यांचा तगादा करु लागली.
मायाबाईच्या तगाद्यापासून सुटका करुन घेण्यासाठी दोघांनी मिळून तिला कायमचे संपवण्याचा कट रचला. शिरागडच्या मंदिरात पूजाविधी केल्यानंतर दागिने परत देतो असे अमोलने तिला खोटेच कथन केले. मात्र शिरागडावर जाण्याच्या निमित्ताने आपण मृत्यूच्या दारात जाणार आहोत याची तिला कल्पना नव्हती. या कटाचा एक भाग म्हणून मांत्रिक मुळीक अगोदरच शिरागडच्या जंगलात जावून बसला होता. मायाबाईला गळफास देऊन ठार करण्यासाठी दोरी व जाळून मारण्यासाठी पेट्रोलची व्यवस्था करण्यात आली होती.
पुजाविधीनंतर आपले दागिने आपल्याला परत मिळतील या भाबड्या आशेने मायाबाई तिचा भाचा अमोल सोबत जाण्यास तयार झाली. अमोल तिला घेऊन तापी नदीजवळच्या जंगलात घेऊन गेला. त्याठिकाणी अगोदरच हजर असलेल्या मांत्रिक संतोष मुळीक याने पुजाविधीची तयारी करुन ठेवली होती.
त्यांनी मायाबाईला खायला पदार्थ दिला. त्यानंतर ती बेशुद्ध झाली. ती बेशुद्ध झाल्यानंतर दोरीने गळा आवळून तिला ठार करण्यात आले. तिचा स्कार्फ तिच्या चेह-यावर टाकून त्यावर पेट्रोल टाकण्यात आले. त्यावर पेटती काडी टाकून चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेनंतर दोघांनी तेथून पलायन केले. अमोल दांडगे तुळजापूर येथे निघून गेला. मांत्रिक संतोष मुळीक हा पाळधी येथे निघून गेला. 15 डिसेंबर रोजी घरातून कामावर जाण्यासाठी गेलेली मायाबाई घरी परत आलीच नाही. तिचा मुलगा विजय हा मुंबई येथे मित्रांसोबत गेलेला होता. या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी साडे नऊ वाजता दिलीप फरसे हे आपल्या कामावर गेले होते. काम आटोपून रात्री साडे आठ वाजता परत आल्यावर त्यांना घरी दरवाजाला कुलूप दिसून आले. त्यामुळे आजूबाजूला, शेजारीपाजारी त्यांनी पत्नी मायाबाईची विचारपूस केली. त्यावेळी त्यांना समजले की त्यांची पत्नी मायाबाई ही दुपारी दोन वाजता भाचा अमोल सोबत गेली आहे. त्यामुळे त्यांनी बराच वेळ पत्नी मायाबाई परत येण्याची वाट पाहिली. मात्र मायाबाई घरी परत आलीच नाही. रात्र झाली असल्यामुळे अगोदरच भुकेने व्याकुळ झालेल्या दिलीप फरसे यांनी तगमग करत सर्व नातेवाईकांकडे मायाबाईची चौकशी केली. मात्र कुठेही त्यांना मायाबाईचा तपास लागला नाही. भाचा अमोल दांडगे याच्या घरी जाऊन त्याला विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याने सांगितले की, मला बाजारात जायचे असल्याने मी मामीला शिवाजीनगर स्मशानभुमीच्या कोप-यावर सोडले व पुढे एकटाच बाजारात निघुन गेलो. अखेर उद्विग्न होत दिलीप फरसे यांनी घरी येत दरवाजाचे कुलूप तोडले.
कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यावर त्यांना घरातील माळयावर असलेली लोखंडी पेटी दिसली नाही. या पेटीत सोन्याच्या चार अंगठया होत्या. त्यापैकी तीन अंगठ्या 3 ग्रॅम व एक 15 ग्रॅम वजनाची होती. याशिवाय मायाबाईच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाची सोन्याची मंगळपोत, चांदीचे पाच शिक्के, चांदीच्या साखळ्यांचा जोड, 3 ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, सव्वा ग्रॅम सोन्याची रिंग, सव्वा ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट असा एकुण एक लाख रुपये किमतीचा सोने चांदीचा ऐवज त्या पेटीत होता. ती पेटी गायब असल्याचे दिलीप फरसे यांच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. भुकेने आणि मनाने कासावीस झालेल्या दिलीप फरसे यांनी या घटनेची माहीती मुंबई येथे गेलेल्या मुलास फोनवर कळवली. सकाळपर्यंत मी जळगावला परत येतो असे म्हणत मुलाने त्यांना धीर राखण्यास सांगितले.
दुस-या दिवशी 16 डिसेंबर रोजी देखील त्यांची पत्नी मायाबाई घरी परत आलेली नव्हती. अखेर त्यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशन गाठले. पत्नी घरातून निघून गेल्याबाबत त्यांनी मिसिंग दाखल केली. मिसिंग दाखल झाल्यानंतर पोलिस कर्मचारी रतन गीते यांनी फरसे यांच्या जावयास सोबत घेत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोधून काढले. सीसीटीव्ही फुटेज तपासात असतांना मायाबाई आणि भाचा अमोल हे दोघे रस्त्याने पायी जातांना आढळून आले. संशयाची पाल चुकचुकल्याने पोलीस कर्मचारी रतन गीते यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अमोलचा शोध घेण्यास सुरुवात केली. अमोल हा तुळजापूर येथे गेल्याचे त्यांना समजले. तो तुळजापूर येथून जळगावला परत आल्याचे समजताच त्याचा शोध घेण्यात आला. त्याला एमआयडीसी परिसरातील मंदिरातून ताब्यात घेण्यात आले. त्याला मायाबाईबद्दल सखोल विचारणा करण्यात आली. मी मामी मायाबाईस शिवाजीनगर येथील स्मशानभुमीच्या कोप-यावर सोडले होते एवढीच माहिती तो देत राहिला.
मात्र त्याला अखेरचा उपाय म्हणून पोलिसी खाक्या दाखवण्याची वेळ पोलीस कर्मचारी रतन गीते व इतरांवर आली. त्यानंतर त्याने माहिती देण्यास सुरुवात केली. त्याने आपला साथीदार मांत्रिक संतोष मुळीक यांच्या मदतीने मायाबाईचा खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे संतोष मुळीक यास शिवाजी नगर येथून ताब्यात घेण्यात आले. अशा प्रकार अमोल दांडगे व संतोष मुळीक या दोघांना अटक करण्यात आली. याकामी सुरुवातीपासून पोलीस कर्मचारी रतन गीते यांचे कठोर परिश्रम लाभले.
पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमोल दांडगे यास सोबत घेत तो सांगत असलेल्या विदगांव शिवारात नेण्यात आले. विदगांव शिवारातील तापी नदीच्या बाजुला असलेल्या जंगलातील नाल्यात मायाबाईचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत मिळून आला. पोलीसांनी मायाबाईच्या मृतदेहासह घटनास्थळ पंचनामा पूर्ण केला. मायाबाईच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
मायाबाई हिच्या अंगावरील व घरातील दागीने चोरुन नेण्यासह तिला विदगांव शिवारातील जंगलात नेऊन ठार करुन तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमोल रतनसिंग दांडगे (रा. शिवाजीनगर जळगाव) याच्या विरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात त्याचा साथीदार संतोष मुळीक याचे नाव पुढे आल्याने त्याला देखील संशयित आरोपी करण्यात आले.
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सपोनि गबाने करत आहेत. या तपासात पोलीस उप निरीक्षक अरुण सोनार, सर्जेराव क्षीरसागर, हे.कॉ.विजय निकुंभ, पोलीस नाईक भास्कर ठाकरे, ओमप्रकाश सोनी, राजकुमार चव्हाण, किशोर निकुंभ, रतन गीते, तेजस मराठे, आरटीपीसी मोरे आदींनी परिश्रम घेतले.