आठवी पास अभिजित सारंग बनला कालीचरण– गांधीजींवर वक्तव्य करुन बांधले प्रसिद्धीचे धरण

मेडिकल दुकान चालक धनंजय सारंग यांचा पुत्र अभिजित धनंजय सारंग सध्या अटकेत असून प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार झाला आहे. महात्मा गांधी यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य करत त्याने खळबळ माजवली आहे. स्वत:ला कालीभक्त म्हणवणा-या अभिजित सारंग याने त्याचे नामकरण कालीचरण असे केले आहे. कालीचरण असे नाव धारण केलेल्या अभिजित सारंग याने छत्तीसगड राज्यातील रायपुरच्या धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरुद्ध वक्तव्य करत खळबळ माजवली आहे. या वक्तव्याची दखल घेत रायपूरचे माजी महापौर व सभापती प्रमोद दुबे यांनी कालीचरण महाराज याच्याविरुद्ध टिकरापारा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. 294, 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर अकोला येथील कॉंग्रेस नेते प्रशांत गावंडे यांनी पुढाकार घेत त्याच्याविरुद्ध अकोला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.

धनंजय व सुमित्रा सारंग या दांपत्याच्या पोटी जन्म घेतलेला अभिजित उर्फ कालीचरण महाराज हा अकोला येथील जुने शहर भागातील शिवाजीनगर येथील भावसार पंचबंगला येथील रहिवासी आहे. त्याचा मुक्काम सध्या पोलीस कोठडीत आहे. छत्तीसगड राज्यातील रायपुर पोलिसांच्या पथकाने त्याला मध्य प्रदेशातील खजुराहो येथून नुकतीच अटक केली आहे. दरम्यान अकोला येथे दाखल गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्याच्या अटकेची मागणी सर्व स्तरातून सुरु होती.

इयत्ता आठवी नंतर अभिजितने शाळेला रामराम ठोकला. अध्यात्म ही एक मोठी बाजारपेठ असल्याचे त्याने बालपणीच ओळखून घेतले. या क्षेत्रात शिक्षणाची आवश्यकता नसते हे देखील त्याच्या लक्षात आले. कोणत्याही डिग्री शिवाय या क्षेत्रात मनुष्य तग धरतो हे ओळखून त्याने कालीमातेची उपासना करण्यास सुरुवात केली. अध्यात्मात मन रमवून कालीमातेचा भक्त म्हणवणा-या अभिजितने स्वत:ला कालीचरण संबोधण्यास सुरुवात केली. 

कोणत्याही डिग्रीशिवाय अजून एक क्षेत्र असल्याचे त्याच्या लक्षात आले. ते क्षेत्र म्हणजे राजकारण. राजकारणात देखील कोणत्याही डिग्रीची गरज नसल्याचे ओळखून त्याने सन 2017 मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी घेतली. मात्र यात त्याने आपटी खाल्ली. प्रसिद्धीची खाज अभिजित उर्फ कालीचरण यास स्वस्थ बसू देत नव्हती. दोन वर्षांपुर्वी त्याने अकोला येथील पुरातन शिव मंदिरात शिवतांडव स्तोत्र म्हटले. या शिवस्तोत्राचा व्हिडीओ प्रसारित करण्यासाठी त्याने खर्च केला. तो खर्च त्याने कसा मँनेज केला हे समजू शकले नाही. खर्च झाला मात्र त्या व्हिडीओच्या माध्यमातून त्याला ब-यापैकी प्रसिद्धी मिळाली. त्याचा खर्च अजिबातच व्यर्थ गेला नाही. प्रवचनाच्या माध्यमातून कालीचरणचा प्रसिद्धीचा खटाटोप सुरुच होता. प्रसिद्धी मिळाल्यानंतर धनलक्ष्मी आपोआपच आपल्या दिशेने वाटचाल करते हे त्याला माहिती होते. 

प्रसिद्धीची खाज कालीचरण यास स्वस्थ बसू देत नव्हती. रायपुर येथील रविवारच्या धर्म संसदेत अकोला येथील मेडिकल दुकानचालकाचा मुलगा असलेल्या अभिजित याने महात्मा गांधी यांच्याविरुद्ध वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली मात्र अडचणी देखील वाढवून घेतल्या. त्याला मध्य प्रदेशातून रायपुर पोलिसांच्या पथकाने अटक केली. अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्याच्या वक्तव्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत.

कालीचरणविरुद्ध कारवाईसाठी विधानसभेत मागणी करण्यात आली. त्याच्या वक्तव्याबाबत राज्यमंत्री नवाब मलिक यांच्याकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला. कालीचरण विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे व त्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील  कालीचरणवर कारवाई होण्यासाठी सरकारकडे मागणी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड यांनी देखील कालीचरण याच्यावर विधानसभेत कारवाईची मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालीचरण याच्याविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here