पुणे : हँलो …… मी अहमदाबादचा पोलीस आयुक्त विजय सिंग बोलत असून मला आपल्या पोलीस आयुक्तांचा मोबाईल क्रमांक हवा आहे….. अशा रुबाबदार शब्दात 8 डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात फोन आला. आपल्या परिसरात एक मोठा गुन्हा घडणार असून मला त्याबाबतची माहिती आपल्या आयुक्तांना द्यायची आहे असे पलीकडून बोलणा-या व्यक्तीने नियंत्रण कक्षातील कर्मचा-यास कथन केले.
नियंत्रण कक्षात कर्तव्यावर असलेल्या कर्मचा-याकडून पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा मोबाईल क्रमांक मिळवण्यात पलीकडून बोलणारा यशस्वी झाला. मात्र काही वेळाने त्याच व्यक्तीचा पुन्हा नियंत्रण कक्षात फोन आला. त्याने यावेळी म्हटले की तुमचे आयुक्त माझा फोन उचलत नाहीत. कदाचित कामात व्यस्त असतील. तरी तुम्ही इतर वरिष्ठ अधिका-यांचे मोबाईल क्रमांक मला द्या. अशा प्रकारे त्याने इतर अधिका-यांचे मोबाईल क्रमांक देखील मिळवले.
पलीकडून बोलणा-या व्यक्तीने एका वरिष्ठ अधिका-याला फोन लावत सांगितले कि पिंपरी चिंचवड भागात पिस्टलची मोठी डील होणार असून ती माहिती देणा-या खब-याला तुम्ही आर्थिक मदत करायची आहे. पलीकडून बोलणा-या व्यक्तीने गुगल पे चा खाते क्रमांक अधिका-यास दिला. त्या खाते क्रमांकावर पोलिसांनी 24 हजार रुपये रवाना केले. पैसे वर्ग झाल्यानंतर पलीकडून बोलणा-या व्यक्तीने आपला मोबाईल क्रमांक बंद करुन टाकला. त्यानंतर मात्र त्याचा फोन सुरु झाला नाही. दिलेली माहिती खोटी असल्याचे देखील उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी लोकेशन काढून तांत्रिक तपासाच्या मदतीने त्याला अटक केली. मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात सुतारी काम करणारा खलील उल्ला नावाचा तो व्यक्ती असल्याचे तपासात उघड झाले. त्याला मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली.