जळगाव : इलेक्ट्रिकल वायर अँसेसरीज तयार करणा-या कंपनीतून सातशे लिटर डिझल चोरी करणा-या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अटक केली आहे.
जळगाव औरंगाबाद महामार्गावर उमाळा शिवारात असलेल्या स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत इलेक्ट्रिकल वायरिंग अँसेसरीजची निर्मिती होते. वीज पुरवठा खंडित झाल्यास पर्यायी या कंपनीत जनरेटरची व्यवस्था आहे. या जनरेटरसाठी लागणारे डीझेल एका बंद खोलीत साठवलेले असते. 27 व 28 डिसेंबर दरम्यान या खोलीचा कडीकोंडा तोडून 65 हजार 800 रुपये किमतीचे सातशे लिटर डीझेल चोरी गेले होते. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखला करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. कंडारी ता. जळगाव शिवारात काही तरुण डीझेलची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक फौजदार अतुल वंजारी, गफ्फार तडवी, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, इमरान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, सुधीर सावळे, निलोफर सय्यद सिद्धेश्वर डापकर, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने सखोल तपास केला. या तपासाच्या माध्यमातून कंडारी गावातून हर्षल भाऊसाहेब बाविस्कर, सुनील रमेश सोनवणे, तरबेज इब्राहीम पिंजारी, अंकित अनिल निकम, वैभव विनोद चिंचोले, रणजीत किरण परदेशी व राम शंकर सूर्यवंशी अशा सात जणांना ताब्यात घेतले. त्यांनी चौकशीअंती आपला गुन्हा कबुल केला. त्यांना अटक करण्यात आली. त्यांना न्या. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 13 लाख 160 रुपये किमतीचे 140 लिटर डीझेल हस्तगत करण्यात आले आहे.