जळगाव : सुरत येथून फरार झालेल्या अट्टल गुन्हेगाराला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यातील मंगरुळ – पारोळा रस्त्यावरुन ताब्यात घेत अटक केली आहे. अटकेनंतर त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कैलास आधार पाटील रा. महादेव नगर सोसायटी नागम डिंडोली सुरत असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध गुजरात राज्यात माहीम, लिंबायत, सचिन व डिंडोली आदी गुजरात राज्यातील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. लिंबायत पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत. इतर ठिकाणी चोरीसह काही गुन्हे दाखल आहेत.
गुजरात पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र तो गुजरात पोलिसांच्या हाती लागत नव्हता. डिंडोली पोलिसांना तो हवा होता. पोलीस त्याच्या मागावर होते. तो जळगाव जिल्ह्यात प्रेयसीला भेटण्यासाठी आला होता. तो जळगाव जिल्ह्यात आला असल्याची माहिती स्पेशल ऑपरेशन गृप सुरत सिटी (गुजरात) यांना समजली होती. त्यांनी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांचेशी संपर्क साधून याबाबत आरोपीचा शोध घेण्यास कळवले.
फरार कैलास आधार पाटील हा पारोळा तालुक्यातील मंगरुळ येथील जंगलात लपून बसला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काढली. स्पेशल ऑपरेशन गृप सुरात सिटी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला शिताफीने अटक केली आहे. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.