पुणे : प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम व पुत्र कुश यांच्याविरुद्ध पुणे जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मयत जमीन मालकाला जिवंत दाखवत त्यांची जागा बळकावल्याचा आरोप पूनम व कुश सिन्हा यांच्यावर करण्यात आला आहे. तक्रारदार संदीप दाभाडे यांनी यापूर्वी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस स्टेशन व इडीकडे तक्रार केली होती.
बंडगार्डन पोलीसांनी या तक्रारीची दखल घेत संदीप दाभाडे यांना उत्तर दिले आहे. सिन्हा परीवारातील सदस्यांविरुद्ध कारवाईचे अधिकार आता जिल्हाधिकारी व दुय्यम निबंधक यांच्या नियंत्रणात येत असल्याचे उत्तर बंडगार्डन पोलिसांकडून संदीप दाभाडे यांना देण्यात आले. त्यामुळे दाभाडे यांनी नव्याने तक्रार दाखल केली आहे.
संदीप दाभाडे यांचे वडील गोरखनाथ दाभाडे यांनी पूनम सिन्हा व कुश सिन्हा यांना सन 2002 व सन 2004 या कालावधीत वडीलोपार्जीत जमिनीचे कुलमुखत्यारपत्र दिले होते. त्यानंतर सन 2007 या कालावधीत गोरखनाथ दाभाडे यांचा मृत्यू झाला. मात्र ते जिवंत असल्याचे घोषणापत्र आणि प्रतिज्ञापत्र सन 2009 व 2010 या कालावधीत सिन्हा यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप आणि दावा दाभाडे यांच्याकडून करण्यात आला आहे.