जळगाव : अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्या अजाणतेपणाचा गैरफायदा घेत त्यांच्यावर अत्याचार करणा-या आरोपीस जळगाव एलसीबी पथकाने अटक केली आहे. कृष्णा महादेव गोरे (24) रा. के.एम.पार्क,स्वामी समर्थ शाळेच्या मागे गुरुदत्त कॉलनी कुसुंबा ता.जि.जळगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला कल्याण जिल्हा ठाणे येथून गर्भवती पिडीत अल्पवयीन मुलीसह अटक करण्यात आली आहे.
कृष्णा महादेव गोरे याने प्रथम सन 2019 मध्ये जळगाव येथील सतरा वर्षाच्या एका अल्पवयीन मुलीस आपल्या जाळ्यात अडकवले. त्या मुलीला पळवून नेल्यानंतर त्याने तिच्यावर एक वर्ष अत्याचार केले होते. अत्याचारातून ती मुलगी गर्भवती झाली होती. याप्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनला त्याच्याविरुद्ध भा.द.वि. 363 व 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेनंतर त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. या घटनेतील मुलगी सज्ञान झाल्यानंतर मयत झाली आहे.
त्यानंतर 10 जून 2021 रोजी त्याने भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील एका अल्पवयीन मुलीस आपल्या जाळ्यात अडकवले. तिला पळवून नेल्याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तो फरार होता. तसेच त्याने पळवून नेलेल्या मुलीचा देखील शोध लागत नव्हता. त्यामुळे तिच्या पालकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती.
या गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक ओंकार महाजन, पोना किशोर ममराज राठोड, पोना रणजित अशोक जाधव, पोना श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पोकॉ विनोद सुभाष पाटील, मपोकॉ योगिता संजय पाचपांडे, चापोकॉ मुरलीधर बारी यांचा या पथकात समावेश करण्यात आला. पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे फरार आरोपी कृष्णा गोरे हा कल्याण जि. ठाणे येथे भाडयाच्या घरात रहात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने शोध घेतला. कल्याण येथे एका भाड्याच्या घरात फारार आरोपी कृष्णा गोरे व त्याच्यासोबत पिडीत सहा महिन्याची गर्भवती मुलगी आढळून आली. अल्पवयीन मुलींना आपल्या प्रेम जाळ्यात अडकवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा कृष्णाचा उद्योग आहे. अल्पवयीन मुली सज्ञान झाल्यानंतर त्यांच्यासोबत लग्न करुन पुन्हा त्यांना त्यांच्या घरी सोडून देणे व मानसिक त्रास देण्याचा प्रकार तो करत असतो. पुढील तपासकामी त्याला भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.