जळगाव : पाच गावठी कट्टे, एक मँगझीन व सात जिवंत काडतूस अशा 1 लाख 47 हजाराच्या मुद्देमालासह चौघा जणांना जळगाव एलसीबी पथकाने अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून गावठी कट्टे विक्रीचा डाव एलसीबीच्या कारवाईने उधळण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका व वरणगाव अशा दोन्ही पोलीस पोलीस स्टेशनाला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आयुध निर्माणी वरणगाव येथील उड्डाण पुलानजीक फाट्याजवळ काही जण गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्याच वेळी तापी नदीवरील विदगाव पुलानजीक एक जण गावठी कट्ट्यासह येणार असल्याची दुसरी माहितीदेखील त्यांना समजली. त्यानुसार या दोन्ही कारवायांसाठी दोन पथके तयार करण्यात आले.
आयुध निर्माणी वरणगाव उड्डाण पुलानजीक करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान संजय गोपाल चंदेले वरणगाव ता.भुसावळ, गजानन शांताराम वानखेडे तरोडा ता. मुक्ताईनगर, निखील महेश चौधरी रनीमाळा नगर वरणगाव या तिघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्यांच्या कब्जातून 4 गावठी पिस्टल, 1 मँगजीन, व चार जिवंत काडतूस असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे यांच्यासह हे.कॉ. पंडित दामोदरे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजीत जाधव खंडेराव देशमुख, पो.कॉ. विनोद पाटील, चालक मुरलीधर बारी आदींनी सहभाग घेतला. या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत विदगाव पुलानजीक सागर कोळी रा. विदगाव याच्या कब्जातून एक गावठी कट्टा, 3 जिवंत काडतूस, असा एकूण 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. महेश महाजन, पो.कॉ. ईश्वर पंडीत, चालक विजय चौधरी आदिनी सहभाग घेतला. दोन्ही कारवायांमध्ये एकूण 1 लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.