जळगाव : आज सकाळी भल्या पहाटे तिन आरोपी जळगाव उप कारागृहातून पळून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकवेळा कारागृह प्रशासनात खळबळ माजली असून कारागृह प्रशासनाच्या कारभाराबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
पळून जाणा-या आरोपींमधे पोलिस खात्यातून निलंबीत झालेला आरोपी सुशील अशोक मगरे (रा. पहुर ता. जामनेर), गौरव विजय पाटील( तांबापुरा-जळगाव), सागर संजय पाटील (पैलाड – अमळनेर ) अशी या तिघा पलायन केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पळून जाणा-यांमधे सुशील अशोक मगरे हा पोलिस दलातून बडतर्फ झालेला व दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याच्यावर जामनेर पोलिस स्टेशनला लुटीचा गुन्हा दाखल आहे. याशिवाय पुणे येथील सराफ दुकानावर शस्त्रांचा धाक दाखवून त्याने दरोडा टाकला होता. त्या गुन्हयात त्याला स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी डिसेंबर 2019 मधे बडोदा येथून शिताफीने अटक केली होती.
जिल्हा कारागृह विविध कारणांनी अधूनमधून चर्चेत येत असते. या उप – कारागृहातून वेळोवेळी कैदी पळून जात असल्याच्या घटना घडत असतात. कारागृहाच्या भिंती कितीही उंच केल्या तरी कोणत्याही मार्गाने कैद्यांना पळून जायचे झाल्यास ते पळून गेल्याशिवाय रहात नाही हा आजवरचा अनुभव आहे.
आझादी अर्थात स्वातंत्र्य मिळणे ही जेल मधील सर्वच बंदिवान कैद्यांची एक तीव्र इच्छा असते.जेल च्या चार भिंतीमधील बंदिस्त जीवन व बाहेरील मुक्त जीवन यात मोठी तफावत असते.जेलचे भले मोठे अवजड लोखंडी गेट म्हणजे जणू काही कैद्यांसाठी लक्ष्मण रेषाच असते.
जेल मधील कैदी बाहेर पळून जावू नये म्हणून तुरुंग प्रशासनाच्या चारही बाजूच्या कडेकोट भिंती अर्थात तट मोठ्या प्रमाणात उंच असतात. आतील कैद्यांना बाहेरच्या जीवनाची हवा देखील लागणार नाही एवढ्या त्या भिंती उंच असतात. बाहेरच्या जीवनात वावरणार्या मुक्त लोकांना जेल मधील वातावरण काय असते हे त्या उंच भिंतीमुळे दिसत नाही व समजत देखील नाही.त्यामुळे आतील कैदी बाहेर पळून जाणे एक मोठे कठीण व दिव्य काम असते.
असे असले तरी “अशक्य” हा शब्द काहींच्या शब्दकोशात नसतो. कितीही त्रास झाला तरी संधी मिळताच पळून जाण्याची कला सर्वांनाच अवगत नसते. हा संधीचा प्रयोग ज्यांना जमतो ते आलेली संधी सोडत नाही.शिवाजी महाराज मिठाईच्या पेटा-यातून मोठ्या शिताफीने पळून जाण्याचा इतिहास आहे. पळून जाणे म्हणजे भित्रेपणा नसतो तर तो एक गनिमी कावा असतो.
जळगाव कारागृहाच्या उंचच उंच भिंतीच्या वर चढून पळून जाण्याचा पराक्रम अधून मधून होत असतो.कारागृहाच्या भिंती कितीही उंच केल्या तरी काही कैदी त्या उंच भिंतीवर देखील चढून , उडी मारून व पळून जावून आपली कला व कसब दाखवण्याचे धाडसी काम करत असतात.
5 डिसेंबर 2018 रोजी रविंद्र मोरे व शेषराव सोनवणे हे दोघे कैदी संधी साधून कारागृहाच्या 17 फुट उंच भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर या कारागृहाच्या भिंतींची उंची वाढवण्यात आल्याचे समजते. तरी देखील पळून जाणारे आरोपी कैदी पळून जाण्याची संधी सोडत नाही हे या घटनेवरुन सिद्ध झाले आहे.