प्रेम हे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते. प्रेम ….. मग ते मानवाचे असो नाहीतर प्राण्यांचे. प्रेमात अडथळा ठरणा-या व्यक्तीचा अनेकदा खून झाल्याच्या घटना आपण बघत, वाचत व ऐकत असतो. प्रेमात अडथळा ठरणा-याचा खून करणारी व्यक्ती मानवता सोडून वागत असते. प्रेमात अडथळा ठरणारा वाघाचा बछडा अर्थात छावा आपल्या जीवाला मुकल्याची घटना उघडकीस आली आहे. बिहारच्या वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात एका भारतीय वाघाचे नेपाळी वाघिणीवर प्रेम जडले होते. दोघांच्या प्रेमात आणि प्रणयात आठ वर्ष वयाचे एक पिल्लू अडथळा ठरत होते. दोघांच्या प्रणय कालावधीत ते पिल्लू त्यांना अडसर ठरत होते. त्यामुळे या वाघाला मोठाच राग आला. कितीही झाले तरी वाघ तो वाघच आणि शेवटी तो हिंस्त्र प्राणी. नेपाळी वाघिणीच्या प्रेमात अडसर ठरणा-या त्या बछडयाला ठार करत वाघाने शेवट केला.
5 जानेवारी रोजी या व्याघ्र प्रकल्पातील काळेश्वर मंदिराच्या कंपाऊंड क्रमांक टी -1 परिसरात आठ महिने वय असलेला वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमेवर सोनहा नदीकिनारी हा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पातील वन विभागाकडून बछडयाच्या मृत्यूचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान 3 व 4 जानेवारी दरम्यान या परिसरात वाघ व वाघिणीचा सहवास आढळून आला. भारताच्या सीमेतील वाघाचे नेपाळ सिमेतील वाघीनीसोबत प्रणयक्रीडेच्या प्रसंगी आठ महिन्याचा बछडा आल्याने संतापलेल्या वाघाने त्याला ठार केले. या परिसरात वर्चस्वाच्या लढाईतून अनेकदा वाघांमध्ये हल्ले झालेले आहेत.