जळगाव : अशोकस्तंभ या राष्ट्रीय चिन्हाचा वापर करण्याचे अधिकार केवळ पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती/ उप सभापती, राज्यसभेचे उप सभापती, मुख्य न्यायधीश व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांना असतात. मात्र असे असले तरी काही आमदार व खासदार अशोकस्तंभ असलेल्या स्टीकरचा वापर आपल्या ताब्यातील व वापरातील वाहनांवर बेधडकपणे करत असल्याचे दिसून आले आहे. जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे यांच्या ताब्यातील व वापरातील एमएच 19 डिव्ही 1 आणि एमएच 19 सीव्ही 0011 या क्रमांकाच्या चारचाकी वाहनावर देखील अशोक स्तंभ असलेल स्टीकर दिसून येते. ते बेकायदा असल्याचे म्हटले जाते.
याबाबत “क्राईम दुनिया” ने जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्याशी संपर्क साधत विचारणा केली असता याप्रकरणी योग्य ती पडताळणी करुन कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे स्टीकर लावणा-या आमदार व खासदारांवर कारवाईची मागणी उल्हासनगरचे समाजसेवक राम वाधवा यांनी 7 जून 2021 रोजी केली होती. वाधवा यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांच्यावर कारवाईचे आदेश वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांसह पोलीस अधिक्षकांना 30 नोव्हेंबर 2021 रोजी दिले आहेत. मात्र जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे हे आपल्या ताब्यातील व वापरातील चारचाकी वाहनावर असे स्टीकर लावून वावरत असतात. त्यांच्यावर कारवाई होणार काय? असा प्रश्न सामान्य जळगावकर नागरिकांकडून विचारला जात आहे.
देशात अशोक स्तंभ असलेले स्टीकर पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेचे सभापती /उपसभापती, राज्य सभेचे उपसभापती, मुख्य न्यायमूर्ती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती लावू शकतात. उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ता राम वाधवा यांच्या तक्रारीची दखल घेत पोलीस प्रशासनाला आदेश जारी करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे हे देखील तेवढेच खरे आहे. पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी आमदार, खासदार आपल्या ताब्यातील व वापरातील वाहनांवरील स्टीकर काढतील काय? हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच पोलीस प्रशासनाकडून अशा वाहनधारकांवर काय कारवाई होते हे देखील पाहणे गरजेचे आहे.