जळगाव : जळगाव येथील जनमत प्रतिष्ठान व शनिपेठ पोलीस यांच्या संयुक्त परिश्रमातून जळगावच्या तरुणाची सोलापूर येथील उसतोड ठेकेदाराच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. जळगाव शहरातील मुकेश सैंदाणे या तरुणास रोजगार देण्याचे आमिष दाखवत काही महिलांनी सोलापूर येथील उसतोड ठेकेदाराच्या ताब्यात देत त्याची परस्पर विक्री केली होती. याबाबत मुकेश सैंदाणे या तरुणाच्या घरी थांगपत्ता लागू देण्यात आला नव्हता. मुकेश बेपत्ता झाल्याने तो हरवल्याबाबत त्याच्या भावाने शनी पेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
सोशल मिडीया व मित्रांच्या माध्यमातून मुकेशचा भाऊ प्रदीप यास तो सांगली जिल्ह्यातील कोगडे या गावी असल्याचे समजले. प्रदीप सैंदाणे याने लागलीच जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या कानावर हा प्रकार टाकला. पंकज नाले यांनी तातडीने शनिपेठ पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांची भेट घेत परिस्थिती कथन केली. पो.नि. हिरे यांनी पंकज नाले, प्रदीप सैंदाणे, हे.कॉ. प्रकाश पाटील, पोलीस कर्मचारी शरद पाटील अशा चौघांना सांगली जिल्ह्यात पाठवले.
सहाशे किलोमीटर अंतर कापत तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने बानेवाडी ता. जत येथून मुकेश सैंदाणे या तरुणास उसतोड ठेकेदाराच्या ताब्यातून सहीसलामत घेण्यात आले. त्याला सुरक्षित जळगाव येथे आणले गेले. याकामी पोलीस उप अधीक्षक विठ्ठल ससे, शनी पेठ पोलीस स्टेशनचे पो.नि. बळीराम हिरे, जत पोलीस स्टेशनचे पो.नि. मंगेश मोहिते, प्रशांत देशमुख, तडवी, शरद पाटील, प्रकाश पाटील, अजिंक्य जाधव स्वप्नरंग संस्थेचे महेश राठी, विजय वानखेडे, हर्षाली पाटील, संजय कुमार सिंग यांनी सर्वांचे आभार मानले. जनमत प्रतिष्ठानकडून त्यांना सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.