भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे खंडणी मागणारे सूत्रधार अटकेत

काल्पनिक छायाचित्र

पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा पी. ए. बोलत असल्याचे सांगून तब्बल २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या मुख्य सुत्रधारासह त्याच्या साथीदारास पोलिसांनी अटक केली आहे. मोबाइल लोकेशनद्वारे माग काढत पुणे येथून दोघा साथीदारांना अटक करण्यात आली. निगडी पोलिसांनी ही कामगिरी केली.

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार विशाल अरुण शेंडगे (कोंढवा, मुळ रा. लोहियानगर) आणि त्याचा साथीदार किरण धन्यकुमार शिंदे (लोहियानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यापूर्वी पोलिसांनी सौरभ संतोष अस्तुर (२१) रा. गंजपेठ, पुणे  याला पोलिसांनी अटक केली आहे.

निगडी येथील एका नामांकित रुग्णालयात आरोपीने १८ जुलैच्या दुपारी चार वाजेच्या सुमारास फोन केला होता. आपण चंद्रकात दादा पाटील यांच्या कार्यालयातून त्यांचा पी. ए. सांवत बोलतोय. कोरोनाच्या महामारीमुळे गरिबांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी तात्काळ २५ लाख रूपये आमच्या पर्वतीच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या असे सांगण्यात आले होते. पैसे दिले नाही तर हातपाय तोडून जिवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली होती.

याप्रकरणी निगडी पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या मोबाइल टॉवर लोकेशनची माहिती घेण्यात आली होती. तो फोन येरवडा येथील एका नारळपाणी विकणा-या मुलीचा असल्याचे तपासात पुढे आले. हा मोबाईल क्रमांक माझ्या वडिलांचा असून त्यातील  सिमकार्ड २९ जून रोजी चोरीला गेले असल्याचे त्या मुलीने पोलिसांना सांगितले. तपासाअंती संबंधित मुलगी व तिच्या वडीलांचा या गुन्हयात सहभाग नसल्याचे तपासात पुढे आले.

आरोपीने पुणे शहरातील काही व्यापा-यांना या क्रमांकावरुन चंद्रकांत पाटील यांचा पीए  बोलत असल्याचे सांगून पैशांची मागणी केल्याची माहिती तपासात पुढे आली होती.  पोलिसांनी त्यातील एका व्यापाऱ्याला आरोपीस फोन करुन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी सौरभ अस्तुर यास पकडले.  त्याची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती आरोपी विशाल शेंडगे हा या गुन्हयातील मुख्य सूत्रधार व किरण शिंदे त्याचा आणखी एक साथीदार असल्याची माहिती पुढे आली.

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरुच ठेवला होता. आरोपी पुणे येथे असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी आरोपींच्या नातेवाईकांचा शोध लावला. त्या नातेवाईकांना आरोपींसोबत संपर्क साधण्यास सांगून भेटायला येण्यास सांगण्यात आले. आरोपींनी नातेवाईकांना भेटायला येतो असे सांगितले. मात्र नातेवाईक व पोलिसांनी दिवसभर वाट बघून देखील आरोपी आलेच नाही. त्यामुळे पोलिसांनी मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे गुरुवारी रात्री पुणे येथून त्यांना अटक करण्यात आली.  

आरोपी विशाल शेंडगे याच्या विरुद्ध कोथरूड, कोंढवा, पौड व समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. आमदार चंद्रकात पाटील,आमदार बाबर, आमदार निम्हण यांच्या नावाने पैसे मागून खंडणीसह फसवणूकीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो.नि. गणेश जवादवाड, स.पो.नि. लक्ष्मण सोनवणे, पो.उ.नि. ज्ञानेश्वर कोकाटे, महेंद्र आहेर व त्यांच्या सहकारी वर्गाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here