अहमदनगर : निलंबित पोलीस अधिकारी सुनील लक्ष्मण लोखंडे (शिवानंद गार्डन हौसिंग सोसायटी वानवडी पुणे) यांच्याविरोधात राहुरी न्यायालयात दोन दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना वेठीस धरण्यासह डीवायएसपी संदीप मिटके यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी सुनील लोखंडे यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. नगर ग्रामीण उप विभागाचे डीवायएसपी अजित पाटील यांनी सुनील लोखंडे विरोधात दाखल दोन्ही गुन्ह्याच्या तपासाअंती प्रत्येकी तीनशे पानी दोषारोपपत्र दाखल केली आहेत.
डिग्रस येथे राहणा-या महिलेसह तिच्या मुलीला 7 ऑक्टोबर 2021 रोजी लोखंडे याने ओलीस ठेवत डांबून ठेवले होते. त्या महिलेला बाहेर येण्याची धमकी देत तिच्या अल्पवयीन मुलीच्या कानशिलाला गावठी कट्टा लावला होता. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप मिटके आपल्या सहका-यांसह घटनास्थळी आले होते. त्यावेळी सुनील लोखंडे यांनी मिटके यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या होत्या. मात्र त्या गोळ्या जमिनीच्या दिशेने गेल्या होत्या.