जळगाव : जळगाव शहरातून जाणा-या महामार्गावरील अजिंठा चौफुलीवर नव्याने सर्कल तयार करण्यात आले आहे. या सर्कललच्या ठिकाणी नावाचा फलक लावण्यावरुन आज शिवसेना व एमआयएम यांच्यात वर्चस्ववादाची लढाई दिसून आली. या वादामुळे महामार्गावर काही वेळ तणाव निर्माण झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणले. याप्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीवरील बांधकाम करण्यात आलेल्या सर्कलच्या जागी एमआयएम पक्षाचे जवळपास 20 ते 25 कार्यकर्ते व काही लोकांमध्ये फलक लावण्यावरुन वाद सुरु होता. स्वातंत्र्य सेनानी खानदेश गांधी मीर शुकृल्ला सर्कल अशा मजकुराचा लोखंडी अँगल असलेला बोर्ड सर्कलच्या पश्चिम बाजूला लावण्यात आला होता. त्या फलकाला विरोध सुरु होता.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक अनिस शेख, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक दीपक चौधरी, सचिन पाटील, इमरान सैय्यद, राजश्री बाविस्कर आदींनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यावेळी एमआयएम पक्षाचे कार्यकर्ते नाजीम मीर (मीर शुकृल्ला यांचा पणतू), सैय्यद दानिश शकील अहमद, शेख अहमद हुसेन, अँड. इमरान हुसेन, मोहम्मद इमरान अब्दुल गणी शेख, रेयान जहागीरदार, शेख शाकीर शेख अजीज, आसिफ शेख फारुख बादलीवाला वगैरे पंधरा ते वीस कार्यकर्ते यांच्याविरुद्ध जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, साथ रोग अधिनियमाचे उल्लंघन तसेच पूर्व परवानगी शिवाय फलक लावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. सहायक फौजदार विश्वास परशुराम बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच वेळी दुस-या गटातर्फे याच जागेवर शिवसेना पक्षाचे जवळपास वीस ते पंचवीस कार्यकर्ते जमले होते. त्यांनी एमआयएम कार्यकर्त्यांच्या फलक लावण्याच्या कृतीला जोरदार विरोध करत लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा लोखंडी डिजीटल बोर्ड आणला. या फलकाला देखील दुस-या बाजूने विरोध सुरु झाला. या घटने प्रकरणी पोलीस कर्मचारी मंदार पाटील यांचा फिर्यादीनुसार शिवसेना पक्षाचे विष्णू भंगाळे, सुनील महाजन, ललित कोल्हे, ललित चौधरी, आशुतोष पाटील, मुज्कुंदा कोळी व इतर पंधरा ते वीस कार्यकर्त्यांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रसंगी पोलीस उप निरीक्षक निलेश गोसावी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस नाईक श्रीकांत बदर, हे.कॉ. शिवदास नाईक, पो.कॉ. सिद्धेश्वर डापकर, सतीश गर्जे, महिला पोलीस कर्मचारी सपना येरागुंटला आदींनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.