जळगाव : सहा महिन्यापूर्वी चोरीच्या गुन्ह्यात सापडलेल्या तरुणास मारहाण केल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किराणा दुकानात चोरी केल्याचा राग मनात ठेवून आपल्याला दुकानदार असलेल्या दोघांनी मारहाण केली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मनोज सुरेश पाटील व लखन सुरेश पाटील असे मारहाणीचा आरोप असलेल्या दोघांची नावे असून योगेश राजेंद्र चौधरी असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे.
रामेश्वर कॉलनी भागात मनोज व लखन यांचे सुनंदा किराणा दुकान आहे. या दुकानात सहा महिन्यापूर्वी चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी योगेश राजेंद्र चौधरी यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तो राग मनात ठेवून आपल्याला मारहाण झाली असे योगेश याचे म्हणणे आहे. गोदावरी हॉस्पिटल येथे वैद्यकीय उपचारासाठी दाखल असलेल्या योगेशच्या जवाबाच्या आधारे एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.