आमदाराच्या आवाजातील ऑडिओ क्लिप रंजू झा या महिलेस अटक व सुटका

नवघर पोलिस स्टेशन

ठाणे : मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या हुबेहुब आवाजातील नकली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या नकली ऑडीओ क्लिप प्रकरणी भाजपच्या एका महिला पदाधिका-यास अटक करण्यात आली आहे. आपल्या आवाजाशी मिळता जुळता आवाज असलेल्या नकली ऑडिओ क्लिपबाबत गीता जैन यांनी 17 जुलै रोजी नवघर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत भाजप पदाधिकारी रंजू झा या महिलेस अटक केली आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये केंद्र सरकारच्या नावे कोरोनाबाबत चुकीची माहिती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.  या ऑडीओ क्लिपमधे पैशांबाबत संवाद आहे. केंद्र सरकार प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाप्रमाणे मनपांना  दीड लाख रुपये देत असल्याबाबत चुकीचा उल्लेख या क्लिपमध्ये आहे. खासगी डॉक्टर, प्रयोगशाळा, आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह रुग्ण कसे वाढतील यासाठी लक्ष ठेवत असल्याचे या क्लिपमध्ये नमूद आहे.

साधा सर्दी-ताप झाला तरी बळजबरी कोरोना रुग्ण म्हणून दाखल केले जात असल्याचे या क्लिपमध्ये म्हटले आहे. दीड लाख रुपये मनपाला मिळाल्यानंतर संबंधित रुग्णाला घरी रवाना केले जाते. त्यामुळे हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करत या तपासण्या बंद करण्याचे आवाहन या क्लिपच्या माध्यमातून करण्यात आले आहे. ही क्लिप आमदार गीता जैन यांचा हुबेहुबे नकली आवाज काढून व्हायरल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांच्या ताब्यातील रंजू झा ही महिला भाजपची उत्तर भारतीय महिला मोर्चाची मीरा भाईंदर उपाध्यक्ष आहे. पोलीस कारवाईनंतर देखील आपल्याला अटक झाली नसल्याचा दावा रंजू झा या महिलेने केला होता. मात्र पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here