कल्याण : अंगात भुत असून ते तंत्रमंत्र केल्यानंतरच बाहेर निघेल या अंधश्रध्देपोटी अंगावर हळद टाकून काठीने दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. या बेदम मारहाणीत आई आणि मुलाचा मृत्यू झाला. पंढरीनाथ शिवराम तरे (50) आणि चंदुबाई शिवराम तरे (76) असे मृत्युमुखी पडलेल्या मायलेकांची नावे आहेत. काल सायंकाळी कल्याण पश्चिमेकडील अटाळी गावात हा अघोरी प्रकार घडला. या घटनेतील मांत्रिकासह तिघांना अटक करण्यात आली. आरोपींमधे एका अल्पवयीनाचा समावेश आहे.
अटाळी येथील गणेशनगर भागात पंढरीनाथ नामक व्यक्ती राहतात. त्यांची पुतणी कविता कैलास तरे हिच्याअंगात दैवी शक्ती संचारते असा त्यांना संशय होता. त्या संशयातून त्यांची पत्नी रेशमा व दुसरी पुतणी संगिता या दोघी कविताला अटाळी गावातील सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे उपचारासाठी घेवून जात असत. त्यावेळी मांत्रिक सुरेंद्र पाटील याने त्यांना सांगितले की पंढरीनाथ आणि त्यांची आई चंदुबाई या दोघांच्या अंगात भुत आहे. दोघा मायलेकाच्या अंगातील भुत तंत्रमंत्र विद्येच्या मदतीने बाहेर काढावे लागेल.
मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे अंधश्रध्देपोटी पंढरीनाथचा अल्पवयीन मुलगा, पुतण्या विनायक तरे, पुतणी कविता या तिघांनी काल पंढरीनाथ व त्यांची वयोवृध्द आई चंदुबाई यांच्या अंगावर हळद टाकून त्यांना काठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघा माय लेकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहीती पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्त जे.डी. मोरे तसेच खडकपाडा पोलिस स्टेशनला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कायदेशीर कारवाई केली.
पंढरीनाथच्या अल्पवयीन मुलासह विनायक तरे (22), कविता तरे (वय 27) यांच्यासह मांत्रिक सुरेंद्र पाटील अशा सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास खडकपाडा पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक पवार करत आहेत.