बीड : बांधकामासाठी विटा खरेदी करण्याच्या बहाण्याने महिलेने वीटभट्टी मालकास फोन करुन बोलावून घेतले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने त्याच्यासोबत आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडीओचा धाक दाखवून विट भट्टी मालकास डांबून ठेवत खंडणीची मागणी करण्याचा खळबळजनक प्रकार बिड जिल्हयात घडला. पोलिसांनी सापळा रचत या हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश केला. याप्रकरणी एका जणाला अटक करण्यात आली आहे. यातील इतर सात आरोपी मात्र फरार आहेत. आरोपींमध्ये दोघा महिलांचा समावेश आहे. आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
बिड जिल्हयाच्य आष्टी येथील एका महिलेने फोनवरुन नितीन रघुनाथ बारगजे (टाकळी ता. केज) या तरुणास फोन केला. तुमच्याकडून विटा घ्यायच्या आहेत, असे सांगून त्याला मांजरसुंबा येथे बोलावण्यात आले. या ठिकाणीत त्यांच्यात विट खरेदी विक्रीची बोलणी झाली. त्यानंतर आपल्यासोबत कुणी नसून मला पाटोद्यापर्यंत सोडा, अशी विनती त्या महिलेने नितीन बारगजे यांना केली. तिच्या विनंतीनुसार बारगजे त्या महिलेला पाटोद्यापर्यंत सोडण्यास गेले. या ठिकाणाहून महिलेने दुसरी विनवणी केली की आता मला आता माझ्या आष्टी गावी परत सोडा.
घरी गेल्यानंतर त्या महिलेने बारगजे यांना चहा घेण्याचा आग्रह केला. चहापानानंतर पुर्व नियोजनानुसार बारगजे यास एका खोलीत कोंडण्यात आले. महिलेने त्याच्यासोबत लगट सुरु केली. त्यानंतर महिलेच्या साथीदारांनी दोघांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काढला. तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, मारहाण करत 15 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. बराच वेळ विनवणी केल्यानंतर दहा लाख रुपये घेवून येण्यासाठी त्या महिलेने त्याच्यासोबत एका जणाला केज येथे पाठवले.
केज येथे बारगजे यांनी आपल्या मित्रांकडे दहा लाख रुपये उधार मागितले. मित्रांना शंका आल्यामुळे बारगजेंसोबत आलेल्या व्यक्तीकडून त्यांनी माहिती घेतली. तुमचे लोक पैसे घेण्यासाठी बोलावून घ्या, व्हिडीओ डिलीट करुन प्रश्न मिटवून टाका असे सोबतच्या त्या व्यक्तीला सांगण्यात आले. त्यानुसार तिघे जण येण्यापुर्वीच या घटनेची माहिती केज पोलिसांना देण्यात आली होती.
सोबत आलेल्या व्यक्तीने दिलेल्या निरोपानुसार त्याचे तिघे साथीदार स्कॉर्पिओ वाहनाने केजमधे आले. याबाबतची माहिती केज पोलिसांना अगोदरच देण्यात आली होती. नितीन बारगजे याच्याकडून खंडणी वसूल करणार्या शेखर पाठक या तरुणास पोलिसांनी अटक केली. पोलिसांची कुणकुण लागताच इतर साथीदार मात्र फरार झाले. या प्रकरणी नेकनूर पोलिस स्टेशनला नितीन बारगजे यांच्या फिर्यादीवरून आरोपी कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.