वेल्डर शाबीर विवाहितेसंग उडवतो प्रेमाची स्पार्कींग- गफ्फारच्या गळ्यावर सोडून जातो फाशीचे मार्कींग!

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : गफ्फारच्या पत्नीचे माहेर जामनेर येथील होते. बांधकाम ठेकेदाराकडे काम करणा-या गफ्फारची पत्नी दिसायला देखणी आणि बोलून चालून  मोकळ्या स्वभावाची होती. ती अधूनमधून माहेरी जामनेर येथे जात होती. जळगाव शहरात गफ्फार व त्याची पत्नी रहात होते. लग्नाच्या पुर्वीपासून गफ्फारच्या पत्नीचा शेख शाबीर या जामनेर निवासी तरुणासोबत परिचय होता. शाबीर वेल्डींग कारागीर होता. तो तिचा जवळपासचा नातेवाईक देखील होता. शाबीरला ती आवडत होती. मात्र तिचे जळगाव येथील गफ्फारसोबत लग्न  झाले. लग्नानंतर ती जळगाव येथे सासरी राहण्यास आली. पती गफ्फार हेच तिचे आता सर्वस्व होते. पती पत्नीचा संसार म्हटला म्हणजे कमी अधिक वाद होतच असतात. घरगुती वादातून ती माहेरी जामनेर येथे राहण्यास आली होती.

जामनेरच्या भुमीवर पाय ठेवल्यानंतर तिची व शाबीरची नजरानजर होण्यास वेळ लागला नाही. वेल्डींग कारागीर शाबीरला ती आवडत होती. सुंदरा मनात भरली……. असे म्हणत तो तिच्यावर मनोमन प्रेम करत होता. त्याच्यासाठी ती त्याची विवाहीत प्रेयसी होती. ती माहेरी आल्याचे दिसताच त्याच्या प्रेमाची कळी पुर्णपणे खुलली. जुन महिन्यात पहिल्या रिमझीम पावसाच्या शिडकाव्याने फुलांना बहार येतो आणि ती डोलायला लागतात. त्याप्रमाणे जामनेर नगरीत तिचे  आगमन होताच तो मनातून डोलू लागला. त्याच्या प्रेमाला उधान आले. तिला बघून तो मनातल्या मनात भलताच खुश झाला. बघता बघता दोघांचे बोलणे सुरु झाले. सुरुवातीला त्यांच्यात संवाद घडून आला. संवादातून सहवास घडून आला. सहवासातून त्यांच्यात प्रेमाचा अंकुर केव्हा फुलला हे त्यांना कळलेच नाही. सुख दुखा:च्या गोष्टी करत करत त्यांच्यात प्रेमाच्या गोष्टी सुरु झाल्या. बघता बघता दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. माहेरी आलेल्या गफ्फारच्या पत्नीला एकाकीपणा कधी जाणवलाच नाही. शाबीर तिला बोलुन चालून खुश ठेवत होता. त्यामुळे तिचे मना रिफ्रेश होण्यास वेळ लागत नव्हता. तिला देखील शाबीरसोबत वेळ घालवतांना आनंद मिळत होता.

बघता बघता सहा ते सात महिन्यांचा कालावधी भरकन निघून गेला. या कालावधीत तिच्या व शाबीरच्या प्रेमाला भरती आली होती. समुद्राच्या लाटांप्रमाणे त्यांचे प्रेम उसळी मारत होते. काही महिन्यांनी तिला सासरचे बोलावणे आले. पती पत्नीमधील घरगुती वादाचा दुरावा कमी होण्यासाठी गफ्फारने तिला जळगावला बोलावले होते. त्यामुळे तिला जळगावला सासरी जाणे क्रमप्राप्त होते. तिची जळगावला जाण्याची वेळ समीप आली तसा शाबीर मनातून दुखी: झाला. आता आपल्या प्रेमाला ओहोटी लागणार हे समजून तो मनोमन दुखी: झाला. तिने त्याच्या दुखा:वर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. आता मला विसरुन जा आणि मला आपल्या पतीसोबत पुढील आयुष्य काढू दे असे म्हणत तिने त्याची समजूत घातली. मात्र तो तिला विसरण्यास तयार नव्हता.

सासरी आल्यानंतर ती आपल्या संसारात रमण्याचा प्रयत्न करु लागली. मात्र गेल्या सहा ते सात महिन्यापासून माहेरी असलेल्या पत्नीच्या वागण्यात गफ्फार यास बदल जाणवला. त्याला तिच्या व शाबीरच्या प्रेमाची कमी अधिक प्रमाणात कुणकुण लागली. त्यामुळे तो तिला अधुनमधून विचारणा करु लागला. जामनेरच्या शाबीरमुळे पती पत्नीत वादाची कमी अधिक ठिणगी पडू लागली. पती गफ्फार आपल्यासोबत वाद घालत असून आपल्या प्रेमसंबंधाला पुर्णविराम द्यावा असे तिने शाबिर यास समजावून सांगितले. आपल्या प्रेमाला पुर्णविराम देणेच योग्य राहील हे तिने त्याला पटवून दिले. त्यावर शाबिर तिला म्हणाला की, मी आपल्या दोघांच्या प्रेमाची कबुली त्याला देतो आणि त्याची माफी मागून समजून घालतो. यापुढे माझ्याकडून आपल्या संसारात कोणताही त्रास होणार नाही याची ग्वाही मी त्याला देतो असे तो तिला म्हणाला. चुकभुल देणे घेणे या स्वरुपात मी त्याची माफी मागून तुमच्या पुढील वैवाहीक जिवनासाठी त्याला शुभेच्छा देईन असे सांगत शाबीरने गफ्फारच्या पत्नीची समजून घालत तिला शांत केले.

मात्र शाबीरच्या मनात काही वेगळेच होते. आपल्या मनातील वादळ त्याने तिला जाणवू दिले नाही. आपल्या प्रेमातील अडथळा असलेल्या तिच्या पतीलाच संपवण्याचा त्याने मनाशी पक्का निर्णय घेतला होता. मात्र गफ्फारला भेटण्यासाठी कधी येणार आहे याची शाबीरने तिला निश्चित माहिती दिली नाही. आपण गफ्फारचा काटा कायमचा दुर करणार असल्याची जराही कुणकुण अथवा भणक त्याने तिला लागू दिली नाही. गफ्फारचा कायमचा काटा काढण्याकामी त्याने गवंडीकाम करणारा त्याचा साथीदार शेख फारुख यास तयार केले.

26 जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे गफ्फार सकाळी नऊ वाजता कामावर गेला. आज आपल्या जिवनातील अखेरचा दिवस आहे हे गफ्फार यास माहित नव्हते. नियतीच्या मनात काय आहे हे कुणालाही माहित नसते. आज अंधार पडल्यानंतर शाबीरच्या रुपात काळ आपल्या जिवनावर घाला घालण्यासाठी येणार असल्याचे त्याच्या  गावीदेखील नव्हते.  नेहमीप्रमाणे ठेकेदाराकडील काम आटोपून गफ्फार घरी जाण्याच्या तयारीत होता. त्याला घरी जाण्यास वेळ झाल्यामुळे पत्नीचा फोन आला. मी लवकरच घरी येत असल्याचे तो तिला म्हणला.

साधारण रात्री आठ वाजेच्या सुमारास कारने तयारीनिशी आलेल्या शाबीरने त्याला जळगावच्या सुभाष चौकात कामानिमीत्त गोड बोलत बोलवून घेतले. दोघे एकाच समाजाचे असल्यामुळे शाबीरने बोलावल्यानुसार गफ्फार तेथे गेला. शाबीरने गफ्फारला आपल्या कारमधे गोड बोलून बसवून घेतले. कारमधे अगोदरच फारुख देखील बसलेला होता. गफ्फारला गळफास देण्यासाठी दोघांनी सोबत एक सुताची दोरी आणली होती. दरम्यान गफ्फार यास घरुन पत्नीचा फोन आला. मी जवळच असून लवकरच घरी येतो असे तो तिला म्हणाला. शाबीरने गाडी त्याच्या घराकडे न नेता ममुराबद रस्त्याच्या दिशेने नेली. रस्त्यात कारमधे गफ्फार व शाबीर यांच्यात थोडीफार शाब्दीक बाचाबाची झाली. तुमचे दोघांचे प्रेमसंबंध मी घरी आणि नातेवाईकांना सांगतो असे गफ्फारने शाबीरला म्हटले. गफ्फारने खरोखरच नातेवाईकांना आपल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली तर आपण अडचणीत येऊ अशी भिती शाबीरला सतावत होती. रागाच्या भरात गफ्फार काही पाऊल उचलण्यापुर्वी त्यालाच या जगातून नाहीसे करण्याच्या तयारीने शाबीर त्याच्या साथीदारासह जळगावला आला होता. याबाबत त्याने त्याची प्रेयसी अर्थात गफ्फारच्या पत्नीला कोणतीही कल्पना जाणीवपुर्वक दिलेली नव्हती.

ममुराबादच्या दिशेने गाडी धावत असतांना दोघांमधे शब्दामागे शब्द वाढत होता. वाद सुरु असतांनाचा शाबीरने गाडीतच गफ्फार यास सोबत आणलेल्या  दोरीने गळफास दिला. गफ्फारचे हात पकडून ठेवण्याकामी फारुखने शाबीरला मदत केली. काही वेळातच गफ्फारने पाय झाडत आपला जिव सोडला.  गफ्फार मरण  पावल्याची दोघांनी खात्री केली. मयत गफ्फार  यास जळगाव – ममुराबाद रस्त्यालगत कृषी चिकीत्सालय तालुका बिज केंद्राजवळ दोघांनी टाकून देत यु टर्न घेतला. रस्ता अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचा देखावा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच गफ्फारचा मोबाईल सोबत घेत दोघांनी तातडीने जामनेरच्या दिशेने पलायन केले. जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात दोघांनी तातडीने जामनेर गाठले आणि आपल्या पुढील कामाला लागले.

रात्रीचे दहा वाजुन गेले तरी कामावर गेलेला गफ्फार घरी परत आला नव्हता. त्यामुळे घरातील सर्वच जण चिंतीत  झाले होते. परिसरातील लोकांकडे व नातेवाईकांकडे मयत गफ्फारच्या लहान भावाने त्याची चौकशी केली. मात्र त्याच्या पदरी निराशाच आली. गफ्फारचा मोबाईल देखील लागत नव्हता. सर्वांनी 26 जानेवारीची रात्र कशीबशी जागून काढली. दुस-या दिवशी 27 जानेवारी रोजी गफ्फारच्या भावाने निवडक नातेवाईकांसह मिसींग दाखल करण्याच्या उद्देशाने शनीपेठ पोलिस स्टेशन गाठले. दरम्यान ममुराबाद रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना समजली होती. मिसींग दाखल करण्याच्या उद्देशाने आलेल्या सर्वांना पोलिसांनी त्या मृतदेहाची माहिती दिली. त्या मृतदेहाची एकवेळा पाहणी करुन घ्या, कदाचित तो गफ्फार असू शकतो असे पोलिसांनी आलेल्या सर्वांना सांगितले. त्याप्रमाणे सर्वांनी पोलिसांसमवेत ममुराबाद रस्त्यावरील मृतदेह असलेले घटनास्थळ गाठले.

मृतदेहाची पाहणी करताच मयत गफ्फारच्या भावाने हंबरडा फोडला. तो मृतदेह गफ्फारचा असल्याचे त्याने ओळखले. मयताची ओळख पटली होती. मयत गफ्फारच्या नाकातोंडातून रक्त आल्याचे दिसून आले होते. गफ्फारचा मृतदेह शव चिकित्सेसाठी सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आला. गफ्फारचा मृतदेह पाहताच वैद्यकीय अधिका-यांनी त्याला मयत घोषीत केले. गळा आवळून गुदमरुन मरण आल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिका-यांनी दिला. या प्रकरणी मयत गफ्फारच्या लहान भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल. सदर गुन्हा जळगाव तालुका पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 30/22 भा.द.वि.302 नुसार नोंद करण्यात आला.

या गुन्ह्याचा पुढील समांतर तपास पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे  तसेच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्याकडे सोपवला. या गुन्ह्याच्या तपासाची धुरा पो.नि. किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने खांद्यावर घेतली. या गुन्ह्याच्या तपासकामी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली. या पथकांमधे पोलिस उप निरिक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक ओंकार महाजन, पोहेकॉ. विजयसिंग धनसिंग पाटील, संजय नारायण हिवरकर, राजेश बाबाराव मेंढे, सुनिल पंडीत दामोदरे, जितेंद्र राजाराम पाटील, अश्रफ शेख निजामोउद्दीन, अक्रम शेख याकुब, लक्ष्मण अरुण पाटील, संदिप श्रावण सावळे, पो. नाईक नितीन प्रकाश बाविस्कर, रणजित अशोक जाधव, किशोर ममराज राठोड, राहुल जितेंद्रसिंग पाटील, अविनाश बापुराव देवरे, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, विजय शामराव पाटील, संतोष रामस्वामी मायकल, पोकॉ. विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चापोहेकॉ राजेंद्र हसंराज पवार, भारत शांताराम पाटील, चापोना अशोक युवराज पाटील, दर्शन हरी ढाकणे यांचा समावेश करण्यात आला. पथकातील सर्वांच्या कामगिरीवर पो.नि. किरणकुमार बकाले यांची बारीक नजर ठाण मांडून होती.

घटनेच्या रात्री जळगाव शहरातील सुभाष चौकात एक संशयीत व्हॅगनर वाहन आल्याची गुप्त माहिती समजली. सदर चारचाकी वाहन भिलपुरा पोलिस चौकीमार्गे ममुराबाद गावाच्या दिशेने गेल्याचे पुढील तपासात समजले. त्या वाहनाचे लोकेशन काही वेळाने पुन्हा त्याच रस्त्याने परत येत जामनेरच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. सदर  चारचाकी वाहन मयताच्या नातेवाईकांमधे कुणाचे होते यादृष्टीने पुढील तपस करण्यात आला. या संशयीत वाहनाचा तपास केला असता या खूनाचे कनेक्शन हळूहळू जुळण्यास सुरुवात झाली. मयत गफ्फारचे त्यावेळी मोबाईल लोकेशन सुभाष चौक परिसर ते ममुराबाद रस्ता परिसरात आढळून आले. गफ्फार व जामनेरचा शाबीर  यांच्यात मोबाईलवर बोलणे झाल्याचे देखील तपासात पुढे आले. त्या दृष्टीने शाबीर यास चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला आपण त्या गावचेच नाही व आपल्याला काही माहितीच नाही असा कांगावा करणारा शाबीर नंतर पोलिसी खाक्या बघताच पोपटासारखा बोलू लागला. आपले मयत गफ्फारच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते असे त्याने कबुल केले. त्याची हत्या करण्याकामी आपला साथीदार फारुख याचे नाव त्याच्या जवाबातून पुढे आले. त्यामुळे त्याला देखील ताब्यात घेण्यात आले. त्याने देखील आपला गुन्हा कबुल केला. शेख शाबीर शेख सुपडू (33) रा.श्रीरामपेठ जामनेर व शेख फारुख ऊर्फ छोटू शेख शोकत (21) रा.श्रीरामपेठ, जामनेर या दोघांना अटक करण्यात आली. अटके दरम्यान शाबीरने कबुल केले की आपले मयत गफ्फारच्या पत्निसोबत प्रेमसंबंध होते. याप्रकाराची घटनेच्या दिवशी चारचाकी वाहनात आपण गफ्फार यालादेखील कबुली दिली. मात्र चिडलेल्या गफ्फारने याबाबत सर्व नातेवाईकांजवळ वाच्यता करण्याची धमकी शाबीरला दिली होती. तो चिडलेला होता व ऐकुन घेण्याच्या तयारीत नव्हता. नातेवाईकात बदनामी होण्याची भिती शाबीरला होती. बोलण्यासाठी गफ्फारने बाहेर काढलेला मोबाईल शाबीरने हिसकावून घेत स्विच ऑफ करुन टाकला होता. गफ्फारची दोरीने गळा आवळून शाबीरने हत्या केली. या गुन्ह्यात मदतीसाठी शाबीरने फारुखला सोबत आणले होते. त्याने गफ्फारचे हात धरुन ठेवले होते. या घटनेतील दोघा संशयीतांना जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here