गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे प्रार्थना सभा, रिमेंबरींग गांधी कार्यक्रम

जळगाव, दि. 29 (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उद्या दि. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधी तीर्थ मधे निमंत्रितांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनतर्फे दुपारी 3 वाजता रिमेंबरींग गांधी या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधींचे कृतज्ञता पूर्वक स्मरण “रिमेंबरींग बापू” या ऑनलाईन होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय अड मॅन आणि स्पेस डिझाइनर उदय पारकर आंतरराष्ट्रीय चित्रकार वासुदेव कामत उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर, तर विशेष उपस्थिती म्हणून संचालक अशोक जैन राहतील. जीवनातील साधेपणा यावर उदय पारकर तर आज गांधीजींची प्रासंगिकता या विषयावर वासुदेव कामत मार्गदर्शन करणार आहेत. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जनमानसात सर्जनशील दृष्टिकोणातून कला निर्माण करणे आणि महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित चिरंतन समाज अंमलात आणण्याच्या उद्देशाने ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला आणि आंतराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धांकरिता ‘क्रिएटीव गांधी’, ‘कोरोना ने शिकवले’, ‘ग्रीन अर्थ- ग्रीन लाईफ’ असे विषय देण्यात आले होते. चित्रकला स्पर्धेसाठी एकूण तीन गट होते तर पोस्टर्स साठी दोन गट होते. चित्रकलेसाठीचा प्रथम गट – इयत्ता 5 वी ते 8 वी, द्वितीय गट – 9 वी ते 12 वी आणि तृतीय गट – महाविद्यालयीन तथा खुला गट होते या तीनही गटांमधे एकूण 895 स्पर्धेकांनी सहभाग घेतला. तर पोस्टर्स स्पर्धेसाठी प्रथम गट – फाईन आर्ट व महाविद्यालयीन विद्यार्थी तर दुसरा गट- कला क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी होता. यामधे एकूण 359 स्पर्धकांनी भाग घेतला. यात भारतासह थायलंड, मलेशिया व अमेरिकामधील स्पर्धकांचा सहभाग होता. यातील विजेत्यांची घोषणा उपरोक्त रिमेंबरींग गांधी कार्यक्रमामधेच करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या जाहिर कार्यक्रमांचे आयोजन करता येत नसल्याने, उद्या सकाळी विशेष निमंत्रितांसाठी गांधी तीर्थच्या प्रार्थनास्थळावर सकाळी 9:30 वा. भावांजली कार्यक्रमाचे आयोजन करोना नियमांचे पालन करून करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम नंतर गांधीतीर्थच्या फेसबुकच्या https://www.facebook.com/gandhiteerth/live वर पाहता येईल. महात्मा गांधीजींची हत्या संध्याकाळी 5.17 मिनिटांनी केली गेली होती. त्याचवेळी सर्व नागरिकांनी, संस्थांनी व आस्थापनांनी दोन मिनीटे मौन पाळून गांधीजींचे स्मरण करावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here