अकोला : पोलिस कोठडी दरम्यान एलसीबीच्या तपास पथकाकडून सराफ व्यावसायीकासोबत झालेले लैंगिक अत्याचार प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणी आता महिला पोलिस कर्मचा-यास निलंबीत होण्याची वेळ आली आहे. निलंबीत होणा-यांची संख्या आता सहा झाली आहे. गिता अवतार असे नव्याने निलंबीत झालेल्या महिला कर्मचा-याचे नाव आहे.
चोरीचे सोने खरेदी केल्याचा आरोप असलेल्या शेगाव येथील सराफ व्यावसायीकास स.पो.नि. नितीन चव्हाण व त्यांच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली होती. पोलिस कोठडीदरम्यान इतर आरोपींकडून सराफ व्यावसायीकाचा लैंगिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय अंगावर गरम पाणी फेकण्यात आल्याचा देखील आरोप पोलिसांवर झाला आहे. जामीनावर सुटका झाल्यानंतर पोलिस अधिक्षकांकडे सराफ व्यावसायीकाने तशी तक्रार केली आहे.
पोलिस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या आदेशाने बुलडाण्याच्या अप्पर पोलिस अधीक्षकांकडे याप्रकरणी चौकशी सोपवण्यात आली होती. प्राथमिक चौकशीदरम्यान याप्रकरणी तथ्य आढळून आल्यानंतर सहायक पोलिस निरिक्षक नितीन चव्हाण, पोलिस शिपाई शक्ती कांबळे, वीरेंद्र लाड, माँटी यादव, संदीप काटकर, चालक दिलीप पवार यांना निलंबीत करण्यात आले आहे. आता त्यात महिला कर्मचारी गीता अवचार यांचा देखील समावेश झाला आहे.