पोलिसांनी जमा केली वर्गणी : वृद्धाच्या डोळ्यात आले पाणी

On: February 5, 2022 8:06 AM

नंदुरबार : कोरोना कालावधीत निधन झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना शासनाने मदतनिधी जाहीर केला होता. या कालावधीत पत्नीचे निधन झाल्यानंतर 75 वर्ष वयाच्या जेष्ठ नागरिकाला शासनाकडून पन्नास हजार रुपयांची धनराशी मिळाली. पन्नास हजार रुपये मिळाल्यानंतर चोरट्यांनी पाळत ठेवत तिच्यावर डल्ला मारला. पत्नी गेली आणि सरकारकडून मिळालेली अनुदानाची रक्कमही गेली, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या वृद्धाच्या मदतीला खाकी वर्दी धावून आली. खाकीची मदत बघून वृद्धाचे डोळे पाणावले. नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील पदम हरचंद कोळी (75) यांना खाकी वर्दीचा हा सुखद अनुभव आला आहे.

शासनकडून जाहीर झालेली रक्कम बॅंकेतून घेतल्यानंतर वाटेत प्रकाशे येथील एका हॉटेलमधून त्यांनी आपल्या नातवांसाठी फरसान खरेदी केले. फरसान खरेदी करत असतांना त्यांच्या रकमेवर टपून बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्याकडील पन्नास हजार रुपयांवर डल्ला मारत  त्यांची रक्कम लांबवली. आरडाओरड करुनही चोरटे पलायन करण्यात यशस्वी झाल्याने पदम कोळी निराश झाले. आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला.

पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्याकडे त्यांनी आपली व्यथा मांडली. त्यांनी लागलीच शहादा पोलिस स्टेशनचे पो.नि. दिपक बुधवंत यांच्यासह संबंधीत अधिकारी वर्गाला वर्गणी जमा करुन वृद्ध पदम कोळी यांना मदत करण्याचे आदेश दिले. “राजा बोले दल हाले” या म्हणीप्रमाणे सर्वच सहकारी अधिकारी कामाला लागले. अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, एलसीबीचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलिस निरिक्षक दिपक बुधवंत, वाचक अर्जुन पटले यांनी पदम हरचंद कोळी यांना पन्नास हजार रुपयांची रक्कम जमा करुन दिली. मिळालेली रक्कम हाती पडल्यानंतर पदम कोळी यांच्या डोळ्यात अश्रू पाणावले. त्यांनी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment