जळगाव : व्हिडीओ तयार करुन इंस्टाग्रामवर टाकत असल्याच्या राग आल्याने सोळा वर्षाच्या मुलाला तिन ते चार जणांच्या टोळक्याने रॉडने मारहाण करत गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे. शाहदाब गफ्फार मणियार (16) रा. टिपू सुलतान चौक तांबापुरा असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी शाहदाब याने दवाखान्यात उपचार सुरु असतांना दिलेल्या जवाबाच्या आधारे हल्लेखोरांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाहदाब गफ्फार मणियार हा त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमधे व्हिडीओ तयार करुन ते इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो. त्याने तयार केलेल्या व्हिडीओचा समीर हनिफ काकर या तरुणास आवडत नव्हते. त्यामुळे त्याने शाहदाबकडे खुनशी नजरेने बघत त्याला दमदाटी केली होती. 11 फेब्रुवारीच्या रात्री समीर काकर व त्याच्या इतर साथीदारांनी त्याला घराबाहेर बोलावले. शाहदाब घराबाहेर येताच त्याला समीर काकर याने हातातील लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. या मारहाणीत शाहदाब गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी हल्लेखोरांच्या तावडीतून सुटका करत त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याने दिलेल्या जवाबानुसार समीर काकर व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेच्या वेळी तांबापुरा परिसरातील वातावरण तणावाखाली आले होते. मात्र लागलीच एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे, इमरान बेग आदींनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मुख्य हल्लेखोर समीर काकर यास मेहरुण तलाव परिसरातून पो.नि.प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैय्यद, नितीन पाटील, सचिन पाटील, योगेश बारी आदींनी अटक केली. तपास अधिकारी अल्ताफ पठाण यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर काकर यास न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरु आहे.