नाशिक : गेल्या आठवड्यात 20 जुलै रोजी नाशिक ते पेठ दरम्यान गुजरात महामार्गावर मालवाहू ट्रक चालक व क्लिनरला लुटण्याचा प्रकार घडला होता. त्या घटनेत ट्रक चालकासह क्लिनरला मारहाण करुन ट्रक हायजॅक करण्यात आला होता. गुजरात महामार्गावर रासेगाव शिवारात 20 जुलै रोजी मालवाहु ट्रक (केए ५६-१९४५) वरील चालक अनिलकुमार बॅनर्जी (रा.संगवळणी, जि.बिदर, कर्नाटक) यास अज्ञात आरोपींनी कार आडवी लावून थांबवले होते.
त्यामुळे थांबलेल्या ट्रकमधून चालक व क्लिनरला ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती. तसेच चालक अनिलकुमारच्या ताब्यातील मालट्रक हायजॅक करण्यात आला होता. ट्रकमधील कॉटनचा माल व अशोक लेलंड कंपनीची ट्रक असा एकुण २६ लाख रूपये किंमतीच्या मुद्देमालाची जबरी लुट करण्यात आली होती. लुटमारीच्या या घटनेबाबत दिंडोरी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हा दिंडोरी पोलीस स्टेशनला गु.र.न. १५३/२०२० भा.द.वि ३९२, ३४१, ३२३, ३४ नुसार दाखल करण्यात आला होता.
या गुन्हयाची नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी गांभिर्याने दखल घेतली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्यासह त्यांच्या पथकावर या गुन्हयाच्या तपासाची समांतर धुरा सोपवण्यात आली होती. या गुन्हयाचा तपासात गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. या गुन्हयातील लुटमार करणारे गुन्हेगार मालेगाव शहर परिसरातील असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती.
मालेगाव शहरातील देवीचा मळा परिसरात सापळा रचुन संशयीत अजहर खान वाजीद खान उर्फ अज्जु (३०) रा. उमराबाग, देवीचा मळा, मालेगाव यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवून त्याच्याकडून माहिती घेण्यात आली. मालेगाव शहरातील त्याचे इतर चार साथीदार या गुन्हयात असल्याचे त्याने कबुल केले. कार आडवी लावून ट्रकवरील चालक व क्लिनरला मारहाण करून ट्रक हायजॅक केल्याची त्याने कबुली दिली. तसेच ट्रकमधील मालाची जबरी चोरी केल्याची त्याने कबुली दिली.
ट्रकमधील कॉटनचा माल विक्री केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. ताब्यातील अझहर व त्याच्या साथीदारांनी केलेले दिंडोरी, देवळा व कसारा पोलीस स्टेशनला दाखल असलेले जबरी लुटमारीचे तिन गुन्हे उघडकीस आले आहे. गुन्हयात वापरलेली टोयोटा कार (एमएच ०३ बीई ०३८२) हस्तगत करण्यात आली. मालट्रक मधील लुट करण्यात आलेले १५ लाख रुपये किंमतीचे ४०९ कॉटनचे बंडल व मालट्रक असा २३ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी अजहर खान याच्या इतर साथीदारांचा स्थानिक गुन्हे शाखा व व दिंडोरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी तपास करत आहेत. ताब्यातील आरोपी महामार्गावरील सराईत गुन्हेगार असुन त्याच्याकडून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी (कळवण विभाग) सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक के.के.पाटील, दिंडोरी पोलीस स्टेशनचे पो.नि.अनिल बोरसे, स.पो.नि. संदिप दुनगहु, स.पो.नि. स्वप्निल राजपुत, पो.उ.नि. कल्पेशकुमार चव्हाण, स.पो.उ.नि रामभाउ मुंढे, पोहवा दिपक आहिरे, पुंडलिक राउत, दत्तात्रय साबळे, गणेश वराडे, नामदेव खैरनार, वसंत महाले, सुहास छत्रे, पोना प्रविण सानप, अमोल घुगे, विश्वनाथ काकड, वसंत खांडवी, हेमंत गिलबिले, चेतन संवत्सरकर, राकेश उबाळे, पोकॉ फिरोज पठाण, प्रदिप बहिरम यांच्या पथकाने जबरी लुटमारीच हा गुन्हा उघडकीस आणला आहे.