उस्मानाबाद : वाशी तालुक्यातील तेरखेडा या गावी 15 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर एका मराठी चित्रपटाचे शुटींग पुर्ण करण्यात आले. चित्रपटाच्या शुटींग दरम्यान विद्यार्थ्यांना अडीच तास उन्हातान्हात बसवून ठेवण्यात आल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. या चित्रपटाचे पोस्टर बालमनावर चुकीचा परिणाम करणारे असल्याचे बोलले जात आहे.
एका मराठी चित्रपटाचे शुटींग बघण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बोलावण्यात आले होते. शाळेच्या वेळेत शालेय शिक्षण बाजूला ठेवत विद्यार्थ्यांना अडीच तास उन्हात बसवून ठेवल्यामुळे काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचे देखील म्हटले जात आहे. शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना सिनेमा शुटींग बघण्यासाठी मैदानावर बसण्याची परवानगी कशी काय दिली याबाबत देखील शंका उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क अनिवार्य असतांना कुणीही मास्क लावू नये अशी सुचना सिने निर्मात्यांकडून देण्यात आली होती.