जळगाव : वाळूची वाहतूक निर्धोकपणे सुरु ठेवण्यासाठी ट्रॅक्टरचालकाकडून दहा हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर तलाठ्याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना उघडकीस आली आहे. भुषण विलास पाटील (32) असे चोपडा तालुक्यातील देवगाव सजा तलाठ्याचे नाव आहे.
तक्रारदाराचे ट्रॅक्टर आहे. त्या ट्रॅक्टरमधून तापी नदीतील वाळू वाहतुक कामासाठी वापरु देण्यासाठी तलाठी भुषण विलास पाटील यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागीतली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली होती. पंचासमक्ष लाचेची मागणी निष्पन्न झाली. त्यामुळे लाचेचा सापळा रचण्यात आला. या सापळ्यात तलाठी भुषण पाटील हे अलगद सापडले. दरमहा दहा हजार रुपये लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता तहसील कार्यालयाच्या आवारात घेत असतांना त्यांना ताब्यात घेण्यात आले.
एसीबीचे पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी संजोग बच्छाव, पो.नि. एन.एन.जाधव, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.