नाशिक : गेल्या आठवड्यात 19 जुलै रोजी सिन्नर ते नाशिक महामार्गावरील मोहदरी घाट परिसरातील टेकडीवर एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाबाबत सुरुवातीला सिन्नर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. या तरुणाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. या खूनाचा तपास नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक के.के.पाटील व त्यांच्या सहका-यांनी यशस्वीरित्या पुर्ण केला आहे.
या अकस्मात मृत्यूच्या तपासात मयत तरुण हा अशोक बारकू महाजन (38) आयटीआय कॉलनी श्रमिक नगर सातपुर नाशिक असल्याचे निष्पन्न झाले होते. मयताच्या डोक्यात हत्याराने वार करुन कुणीतरी त्याचा खून केला होता. खूनानंतर त्याचा मृतदेह मोहदरी घाटात फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी सिन्नर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.566/20 भा.द.वि.302, 201 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.के.के.पाटील व त्यांचे सहकारी करत होते.
तपासाअंती मयत तरुण अशोक महाजन हा सिन्नर एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये प्रॉक्सी पेंटींगची कामे करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सिन्नर एमआयडीसी परिसरात तपास करत होते. माहिती संकलीत करत मयताच्या परिचयातील मित्र संदिप मनोहर सोनवणे (२६) रा. बाहुले मळा, अशोकनगर, सातपुर-नाशिक याचे नाव पुढे आले. त्याची चौकशी केली असता खूनाचा उलगडा झाला.
मयत अशोक महाजन व आरोपी संदिप सोनवणे हे गेल्या दिड वर्षापासुन मित्र होते. दिनांक १७ जुलै रोजी मयत अशोक महाजन याने संदिप मनोहर सोनवणे याचेकडून खर्चासाठी 700 रूपये उधार घेतले होते. तसेच सिन्नर माळेगाव एमआयडीसी येथील एका इसमाकडून मयत अशोक यास 18 हजार रुपये घ्यायचे होते. ते पैसे घेण्यासाठी मयत अशोक महाजन याने संदिप सोनवणे यास 17 जुलै रोजी सोबत नेले होते. वाघ नावाच्या इसमाकडून मयत अशोक याने 18 हजार रुपयांची रक्कम ताब्यात घेतली. त्यानंतर दोघे मित्र पुन्हा नाशिकला परत आले.
परत येतांना वाटेत मोहदरी घाटात संदिप सोनवणे याने गाडी थांबविली व मयत अशोक महाजन यास उधारीचे सातशे रुपये मागू लागला. त्यावेळी अशोकने त्याला म्हटले की मी तुला आता पैसे नाही देणार नाही. मी तुला नंतर देईल असे सांगितले. त्यावर संदिपने त्याला म्हटले की तुझ्याकडे 18 हजार रुपये असून देखील तु मला माझे सातशे रुपये का देत नाही? यावरुन दोघात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची व नंतर झटापट झाली.
या झटापटीत राग अनावर झाल्याने संदिपने बाजुस पडलेला एक मोठा दगड उचलुन अशोकच्या डोक्यात टाकला. त्यामुळे अशोकच्या डोक्यात मोठी जखम झाली व तो जागेवरच मयत झाला. अशोक महाजन मयत झाल्यावर संदिप सोनवणे याने त्याच्या खिशातील 18 हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेत नाशिकच्या दिशेने पोबारा केला. अशा प्रकारे उधारीच्या पैशातून दोघा मित्रात झालेल्या वादातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपी संदिप सोनवणे यास पुढील तपासकामी सिन्नर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
नाशिक ग्रामीण जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी हा तपास पुर्ण केला. त्यांना या कामी स.पो.नि.अनिल वाघ, सहायक फौजदार प्रभाकर पवार, पोलिस हवालदार चव्हाणके, पो.ना. प्रितम लोखंडे, हेमंत गिलबिले, पो.कॉ. निलेश कातकाडे, किरण काकड, संदिप बहिरम यांनी अथक परिश्रम घेतले.