विवाहितेची छेडखानी करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा

जळगाव : वारंवार विवाहितेची छेडखानी करणा-या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा पती परगावी कामानिमीत्त गेल्याचे बघून या तरुणाने विवाहितेची छेडखानी करण्याचा जणू पिच्छाच पुरवला होता. अखेर घाबरलेल्या विवाहितेने तिच्या पतीला परगावाहून बोलावून घेतल्यानंतर पतीसोबत पोलिस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र बच्छावत असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

खेडी शिवारात राहणा-या विवाहितेचा पती कामानिमीत्त परराज्यात गेला होता. घरी तिचा मुलगा व पुतण्या असे तिच्यासोबत होते. विवाहिता रहात असलेल्या घरासमोर जितेंद्र बच्छावत हा त्याच्या आईसोबत राहतो. त्याची या विवाहितेवर वाईट नजर असते. तिचा पती घरी नसल्याचे बघून तो नेहमी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. दळणाला जातांना तसेच रस्त्याने भाजीपाला घेत असतांना त्याने वेळोवेळी तिची छेड काढली. एके दिवशी त्याने तिच्या केसांना लावलेले क्लचर काढल्याने ती घाबरली.

अखेर तिने परराज्यात गेलेल्या पतीला या घटनेची माहिती दिली. हातातील काम अर्धवट सोडून विवाहितेचा पती जळगावला परत आला. त्याने जितेंद्र बच्छावत यास समजावण्याचा प्रयत्न करुन देखील तो ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्याने उलट दोघा पती पत्नीला शिवीगाळ करत तुमच्याकडून जे होईल ते करुन घ्या, मी तुमची गाडी फोडून टाकेन असा दम दिला. अखेर विवाहितेने आपल्या पतीसह एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठत जितेंद्र बच्छावत याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here