मालमत्ता हडपण्याची राहुलला चढली होती नशा!— पिता पुत्राची हत्या करुन गुंडाळला त्यांचाच गाशा!!

नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस (70) तसेच त्यांचा डॉक्टर पुत्र अमित कापडणीस (35) यांची मालमता हडपण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. दोघे पिता पुत्र गेल्या 28 जानेवारीपासून बेपत्ता असल्याची खबर नानासाहेबांची मुलगी शितल कापडणीस यांनी पोलिसात दिली होती.

पोलिसांनी तपासकामी  नानासाहेब यांच्या बँक खात्याची माहिती घेतली असता शेअर्स विक्रीचे नव्वद लाख रुपये संशयित राहुल गौतम जगताप याच्या बॅंक खात्यात वळते झाल्याचे आढळून आले व गुन्ह्याच्या तपासाला दिशा मिळाली. शेअर ट्रेडर असलेल्या संशयीत राहुल जगताप याला तातडीने ताब्यात घेत अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश  दिले. अतिशय किचकट गुन्हा तब्बल दोन महिन्याच्या कालावधीनंतर  सरकारवाडा  पोलिसांनी उघड केला आहे. 18 डिसेंबर ते 28 जानेवारी या कालावधीत नानासाहेबांचा फोन संशयित राहुलच्या ताब्यात होता. तो फोन राहुल हाताळत होता. त्यांचे शेअर्सचे व्यवहार देखील तो मोबाईलच्या माध्यमातून हाताळत होता.

नानासाहेब कापडणीस यांची पत्नी व मुलगी शितल हे दोघे पवई (मुंबई) येथे रहात होते. नाशिकच्या पंडित कॉलनीतील इमारतीत नानासाहेब व त्यांचा मुलगा अमित असे दोघे जण रहात होते. नानासाहेबांचा मुलगा अमित (35) हा एमबीबीएस असला तरी तो वैद्यकीय व्यवसाय करत नव्हता. तो कुणात फारसा मिसळत नव्हता. मात्र त्याच  इमारतीमधील शेअर ट्रेडर राहुल जगताप याने अमित सोबत मैत्री निर्माण  केली होती. तो अमितला  नेहमी  बिअर पिण्यासाठी  घेऊन जात होता.  अमितला बिअरची नशा चढल्यानंतर तो त्याच्याकडून  नानासाहेबांच्या संपत्तीची सखोल चौकशी करत होता. वडील नानासाहेबांचे नाशिक शहरात चार फ्लॅट असून सावरकर नगरात तिन मजली बंगल्याचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे संशयीत राहुल यास अमितकडून समजले होते. याशिवाय द्वारका येथे एक व्यावसायीक गाळा असल्याचे देखील राहुल यास अमितच्या बोलण्यातून समजले होते. एवढी मालमत्ता नानासाहेबांकडे असल्याचे समजल्यानंतर राहुलने ती हडप करण्याचे मनाशी ठरवले. त्यातून त्याने दोघांची हत्या करण्याचे नियोजन केले.  त्यासाठी त्याने अमितला जास्तीत जास्त व्यसनाधिन केले.

संशयित राहुल जगताप याने नानासाहेबांची हत्या करुन त्यांचा मृतदेह मोखाडा येथे गोंदेगावातील निर्मनुष्य जागी टाकला. हत्येनंतर त्यांची ओळख पटू नये यासाठी त्यांचा चेह-यावर स्पिरीट टाकून जाळण्यात आला. त्यानंतर दहा दिवसांनी अमित कापडणीस याची हत्या केल्यानंतर  त्याचा मृतदेह राजूर (ता. अकोले, जि. नगर) येथे निर्मनुष्य जागी टाकण्यात आला. त्याचा चेहरा देखील जाळून टाकण्यात आला होता. या दोन्ही वेगवेगळ्या घटनांप्रकरणी मोखाडा पोलिस स्टेशनला 18 डिसेंबर 2021 आणि राजूर पोलिस स्टेशनला 28 डिसेंबर 2021 रोजी  हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. 

नानासाहेब कापडणीस यांच्या हत्येननतर ते नवीन बंगल्यात राहण्यास गेल्याचा देखावा करत त्याने जुनी पंडित कॉलनी येथील फ्लॅटमधील साहित्य देवळाली कॅम्पला नेले होते. नानासाहेबांची मुलगी शितल हिने फोन केल्यानंतर संशयित राहुलचा गोंधळ उडाला व तिला शंका आली. मोबाईलवर फोन केल्यानंतर नानासाहेब उपलब्ध होत नव्हते. त्यांचा मोबाईल फोन संशयीत राहुल हाताळत असे. नानासाहेबांच्या मुलीने सरकारवाडा पोलिस स्टेशनला 28 जानेवारी वडील आणि भाऊ (दोन्ही रा. आनंद गोपाळ पार्क, जुनी पंडित कॉलनी, नाशिक) हे बेपत्ता झाले असल्याची तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक यतिन पाटील यांनी तपासाला सुरुवात केली.

तपासात पोलिसांनी नानासाहेबांचे बँक खाते, डिमॅट खाते व इतर सर्व आर्थिक व्यवहार तपासून काढले. नानासाहेब रहात असलेल्या इमारतीत राहणारा संशयित राहुल जगताप याने त्यांचे शेअर्स विक्री करुन आलेली रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग केल्याचे आढळून आले.  तपासाअंती त्यांची हत्या राहुल यानेच केल्याचे उघड झाले आहे. कापडणीस यांची शहर व परिसरातील करोडो रुपयांची मालमत्ता गडप करण्यासाठी खून केल्याचे त्याने कबुल केले. शेअर्स विकून आलेल्या रकमेतून त्याने भावाच्या नावे रेंज ओव्हर कार खरेदी केली. दोघांचे मृतदेह परजिल्ह्यात जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.वरिष्ठ पोलिस  निरीक्षक साजन सोनवणे, यतिन पाटील, मच्छिंद्र कोल्हे यांच्या पथकाने या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here