पुणे : आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे यांच्याविरुद्ध फसवणूकीसह दमदाटी केल्याप्रकरणी आतापर्यंत पाच गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्याविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला आणखी एका गुन्हयाची भर पडली आहे. बर्हाटे यांनी फरार होण्यासाठी मावळ तालुक्यातील देवले येथील एका ओळखीच्या व्यक्तीची स्कुटर चोरुन नेली आहे.
याप्रकरणी संतोष राजाराम गिरी (३९) रा. देवले, ता. मावळ यांनी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. सदर घटना ११ जुलैच्या पहाटे साडेचार ते साडेसहा वाजेच्या दरम्यान घडली. बांधकाम व्यावसायिकास २ कोटी व रास्ता पेठेतील भुखंड देण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी रवींद्र बर्हाटे याच्यासह चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा ७ जुलै रोजी दाखल करण्यात आला आहे.
या गुन्हयात पोलिसांनी पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप व एका महिलेस अटक केली होती. आपल्या मागावर पोलिस असल्याची कुणकुण लागल्याने रवींद्र बर्हाटे फरार झाले. त्यांना पळून जाण्यास मदत केली म्हणून पोलिसांनी तिघांना अटक केली. आता त्यांची जामीनावर सुटका झाली आहे.
पळून जाताना रवींद्र बर्हाटे व संतोष गिरी हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आले होते. संतोष गिरी हे मजुरीचे काम करतात. ११ जुलैच्या दिवशी बर्हाटे यांचा गिरी यांना फोन आला होता की महामार्गावर त्याची गाडी बंद पडली आहे. गाडी दुरुस्त होईपर्यंत ब-हाटे हे गिरी यांच्या घरी आले. जातांना ब-हाटे यांनी गिरी यांची स्कुटर काही वेळासाठी घेतली. ड्रायव्हरजवळ स्कुटर पाठवून देतो असे सांगून ते निघून गेले मात्र ती स्कुटर परत आलीच नाही. या प्रकरणी गिरी यांनी पोलिसात रितसर फिर्याद दाखल केली आहे.