खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीने केली बनावट प्लॉट विक्री

जळगाव : खूनासह बनावट नोटा तयार करणे, फसवणूक करणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीने बनावट आधार व पॅन कार्डचा वापर करुन प्लॉटची परस्पर विक्री केल्याचे उघड झाले आहे. त्याला जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. खरेदीखतावर असलेल्या फोटोच्या मदतीने पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले. जगन रामचंद्र नारखेडे (42) रा. भालेगाव ता. मलकापूर -बुलढाणा असे अटकेतील संशयीत आरोपीचे नाव असून त्याला मलकापुर येथून अटक करण्यात आली आहे.

जळगाव येथील व्यापारी सुरेश मांगीलाल बाफना (रा. सुयोग कॉलनी) यांच्या मालकीचा जळगाव शहर मनपा हद्दीत बखळ प्लॉट असून त्याचे बाजारमुल्य 35 लाख रुपये आहे. सुरेश बाफना यांनी आपल्या मालकीच्या प्लॉटचा सात बारा उतारा मिळवला असता त्यांना आपल्या प्लॉटवर आपल्या ऐवजी दुस-याच चार जणांची नावे आढळून आली. याप्रकरणी त्यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासात या बनावट प्लॉट खरेदी विक्रीच्या व्यवहारात ओळख देणा-या महिलेस सर्वप्रथम अटक करण्यात आली. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्रीचा व्यवहार करतांना खरेदी खतावर संशयित जगन रामचंद्र नारखेडे याचा फोटो होता. त्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला मलकापूर येथून अटक केली आहे. जगन नारखेडे याच्याविरुद्ध सन 2009 मधे ठाणे व 2013 मधे जिल्हा पेठ जळगाव पोलिस स्टेशनला नकली नोटा तयार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. इगतपुरी पोलिस स्टेशनला फसवणूकीचा सन 2020 मधे एक गुन्हा दाखल आहे. तसेच सन 2021 मधे श्रीरामपूर व अहमदनगर येथे खूनाचा गुन्हा दाखल आहे. तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील सराईत गुन्हेगार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिपक जगदाळे व त्यांचे सहकारी दत्तात्रय बडगुजर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here