जळगाव : शेतजमीनीच्या सात बारा उता-यावरील इतर अधिकार नोंदीतील नाव कमी करण्याकामी पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कोतवाल आणि तिचा स्विकार करणा-या खासगी इसमाविरुद्ध जळगाव एसीबीच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लाचेचा स्विकार करणा-या खासगी इसमास (जनरल स्टोअर चालक) एसीबी पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. जहांगीर बहादुर तडवी (56) असे मालोद तलाठी कार्यालयातील कोतवालाचे व मनोहर दयाराम महाजन (45) असे जनरल स्टोअर चालकाचे (खासगी इसम) नाव आहे.
तक्रारदाराची यावल तालुक्यातील सावखेडा येथे शेतजमीन आहे. या शेतजमीनीच्या सात बारा उता-यावर तक्रारदाराच्या बहिणीचे नाव कमी करायचे होते. मंडळ अधिकारी किनगाव यांच्याकडून ते कमी करण्याकामी व त्यांच्या नावाने पाच हजाराच्या लाचेची मागणी कोतवालाने केली होती. कोतवालाच्या सांगण्यावरुन खासगी इसमाने ती किनगाव येथील जनरल स्टोअर येथे स्विकारली. एसीबी डीवायएसपी शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एन.एन.जाधव यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.प्रदिप पोळ आदीनी या कारवाईत सहभाग घेतला.