पुणे : वानवडी येथील लक्ष्मी पार्क जंगल परिसरात बारा वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खुन करण्यत आला होता. हा खूनाचा प्रकार 10 जुलै रोजी उघडकीस आला होता. या खूनाचा तपास कोंढवा पोलिसांनी पुर्ण करण्यात यश मिळवले आहे. या खूनातील चौघांना पुढील तपासकामी वानवडी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
रोहित गौतम बनसोडे (27) रा. उंड्री, अजय विजय गायकवाड (22), रा़ कृष्णानगर, महंमदवाडी रोड, श्रीकांत भिमराव साठे (20) , रा. कृष्णानगर, अक्षय अनिल जाधव (20), रा. आझादनगर, वानवडी अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. अझान झहीर अन्सारी (12), रा.शिवनेरी, कोंढवा खुर्द असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. सदर खूनाची घटना 10 जुलै रोजी उघडकीस आली होती. जंगलाचा निर्मनुष्य भाग असल्यामुळे या हत्येविषयी कुठलाही पुरावा नव्हता.
दरम्यान हत्या झालेल्या अझान अन्सारी या मुलाच्या आईने आपला मुलगा हरवल्याची तक्रार कोंढवा पोलिसांना दिली होती. वानवडी पोलिस व कोंढवा पोलीस या मिसींगचा तपास करत होते. बेपत्ता अझान अन्सारी हा वयाने लहान असला तरी तो बालगुन्हेगार होता. तो अनेक गुन्हे करत होता. रोहन अजित सिंग यांची पान टपरी असून अझान अन्सारी याने त्यांच्याकडे खंडणी मागितली होती. पैसे दिले नाही तर टपरी जाळण्याची धमकी त्यांना देण्यात आली होती. सतिश गायकवाड याला देखील अझान अन्सारी बद्दल राग होता.
रोहन अजित सिंग व रोहित बनसोडे यांनी सतिश गायकवाड याच्या सांगण्यावरून ८ जुलैच्या दुपारी तिन वाजेच्या सुमारास अशोका म्युजसमोरुन दुचाकीवरुन त्याला महंमदवाडी येथून गणेशनगर मैदानावर नेले होते. त्याठिकाणी सतिश गायकवाड, अजय गायकवाड, श्रीकांत साठे, अक्षय जाधव हे चौघे जण आले. ते सर्वजण अझान अन्सारी यास लक्ष्मी पार्क जंगल परिसरात घेवून गेले. तेथे त्याला दारु पाजण्यत आली. त्यानंतर तो दारुच्या नशेत असतांना त्याच्या डोक्यात व चेहऱ्यावर दगड मारुन त्याला जिवानिशी संपवण्यात आले. या घटनेतील सतिश गायकवाड हा फरार आहे.
पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक आयुक्त सुनिल कलगुटकर, वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन मोरे, संतोष नाईक, सुशिल पवार, निलेश् वणवे, अमित साळुंखे, संजीव कळंबे, ज्योतिबा पवार, आदर्श चव्हाण, किशोर वळे, किरण मोरे यांनी ही या गुन्हयाचा तपास पुर्ण केला.
या खुनात कुठलाही पुरावा नव्हता. मात्र मयत अझान अन्सासी याला दोघे जण दुचाकीवरुन नेत असतांना ते सीसीटीव्ही फुटेजमधे कैद झाले होते. मात्र त्या दुचाकीवरील क्रमांक दिसत नव्हता. तपासाअंती समजले की मयतास ज्या दुचाकीवरुन नेले होते ती दुचाकी साई मेडीकलसमोर उभी होती. त्या दुचाकीवर श्री असे लिहिलेले स्टीकर असल्याची गुप्त माहिती पोलिस शिपाई किशोर वळे यांना गुप्त बातमीदाराकडून समजली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हयातील नंबर प्लेट नसलेली दुचाकी निष्पन्न करण्यात आली व तपासाला वेग आला. रोशन अजितसिंग याच्या घराबाहेर ती दुचाकी उभी असल्याचे समजताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सर्व प्रकार समोर आला.