जळगाव : रावेर तालुक्यातील चिनावल या गावी निखिल कमलाकर भारंबे व कमलाकर नारायण भारंबे या शेतक-यांचे एक हजाराहून अधिक केळीचे घड अज्ञाताने कापून फेकल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेत शेतक-यांचे सुमारे चार लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. संतप्त शेतक-यांनी या घटनेप्रकरणी पोलिस अधिका-यांना घेराव घातला होता. वातावरण बेकाबू झाल्यामुळे गावात दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करावे लागले.
सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, पोलिस उप निरीक्षक समाधान गायकवाड, राजेंद्र पवार आदींनी घटनास्थळी धावा घेत गावात बंदोबस्त वाढवला. दंगा नियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या बोलावून तैनात करण्यात आल्या. शेतकऱ्यांची बैठक घेत यावेळी संतप्त शेतक-यांना पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले. श्रीकांत सरोदे, कमलाकर भारंबे, तुषार महाजन, गोपाळ नेमाडे, चंद्रकांत भंगाळे, योगेश बोरोले, कुंदन पाटील आदी शेतकरी बांधवांनी आपला संताप यावेळी व्यक्त केला.