इमारतीवरुन जेलमधे वस्तू फेकतांना एक अटकेत

जळगाव सब जेल

जळगाव : जळगाव उप कारागृह वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने गाजत असते. जळगाव उप कारागृहातील वादग्रस्त घटनांमुळे वेळोवेळी कारागृह अधिक्षक वादाच्या भोव-यात सापडले आहेत. प्रसंगी त्यांच्या बदल्या देखील झाल्या आहेत.

काही दिवसांपुर्वी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून बंदी पलायनाची घटना अगदी ताजी आहे. या घटनेची शाई वाळत नाही तोवर आज दुपारी सरकारी कर्मचा-यांच्या निवासस्थानावर चढून वस्तू बंदीसाठी वस्तूचे पार्सल फेकण्याचा प्रकार उघडकीस आला. वस्तू फेकून पलायन करणा-या सोनू रमेश राठोड (२०), रा.सुप्रीम कॉलनी याला पाठलाग करत शिताफीने पकडण्यात यश आले. साई उर्फ उमेश आटे व अविनाश शिंदे हे दोघे मात्र पळून गेले आहेत. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील सोनूला अटक करण्यात आली आहे.

आज कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अमीतकुमार रोहिदास पाडवी यांची सकाळी ६ ते दुपारी १ अशी सर्कल अमलदार म्हणून ड्युटी सुरु होती. दरम्यान दुपारच्या वेळी एक तरुण परिसरातील सरकारी निवासस्थानाच्या इमारतीवर गेला. तो त्याच्य हातातील वस्तूची पिशवी कारागृहात फेकण्याच्य तयारीत होता.

हा प्रकार ड्युटी वरील अंमलदाराच्या लक्षात आला. याबाबत कुणकुण लागताच अधिकारी किरण पवार,गेट किपर कुलदीप दराडे व रक्षक विक्रम हिवरकर यांनी या इमारतीकडे धाव घेतली. दरम्यान पिशवी फेकणारा पळू लागला. त्याच्यासोबत अजून दोन सहकारी होते. यातील दोघे पळून गेले. पकडण्यात आलेल्या तरुणाचे सोनू राठोड असल्याचे निष्पन्न झाले. तो कारागृहात फेकत असलेल्या पिशवीत साबण, ब्रश व इतर साहित्य होते. कारागृहातील बंदी असलेल्या दिनकर रोहिदास चव्हाण याच्यासाठी ती पिशवी होती.

या घटनेची माहिती समजताच कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी सोनूला जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. उर्वरित दोघांचा तपास सुरु असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कारागृहाच्या भिंती अजून उंच करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here