महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड डॉन “दाऊद” इब्राहिमची चर्चा सुरु झाली आहे. तत्पुर्वी केंद्र – राज्य संघर्ष कसा टोकाला पोहोचलाय हे रोजच्या नवनवीन घडामोडीवरुन दिसून येते. प्रत्येक देशात लोकशाही, अध्यक्षीय किंवा हुकुमशाही यापैकी एक राज्यपद्धती असते. कायदे कानून आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल असते. तरीही काही देशांमधे – राज्यांमधे विविध प्रकारचे गुन्हे करणा-या टोळ्या स्थापन करणारे – समांतर गुन्हेगारी प्रशासन चालवणारे डॉन तथा भाई लोक असतातच. दहशतीच्या मार्गाने रिअल इस्टेट, व्यापारी क्षेत्रातील लोकांकडून खंडणीखोरीच्या माध्यमातून कोट्यावधीची हप्ता वसुली करणा-या गुंडांच्या टोळ्या मुंबईकरांना नवीन नाहीत. प्रत्येक गुंडाचा एरिया (कार्यक्षेत्र), गुंड टोळ्यांमध्ये वर्चस्व गाजवण्यासाठी झालेली टोळीयुद्धे हा आता इतीहास झाला. या शस्त्रासज्ज गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिस दल जंग जंग पछाडत असले तरी त्यांना म्हणजे कायद्यालाही चकवा देण्यासाठी सर्व प्रकारच्या पळवाटांचा वापर ही भाई मंडळी कशी करते ते देखील आता जनतेपासून लपलेले नाही.
पोलिस दलात जसे काही अधिकारी सुपरकॉप, आयर्न मॅन, शार्प शुटर म्हणून गाजले तसेच अंडरवर्ल्डच्या क्षेत्रात “सुपर डॉन” म्हणून “दाऊद”हे नाव गाजत आहे. त्याचा उजवा हात म्हणून “छोटा शकील” ओळखला जातो. तर हा कुविख्यात डॉन म्हणून गाजलेला दाऊद सध्या पाकीस्तानात राहून हायप्रोफाईल दहशतवादी कृत्ये हाताळतो असे आरोप आहेत. पाकीस्तान आणि भारत या दोन देशांची दोस्ती दुश्मनी जागतीक स्तरावर सुपरिचीत आहे. अलिकडेच राज्यातील सत्तारुढ महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना केंद्रीय यंत्रणा “ईडी”ने एका प्रकरणात अटक केली आहे. सन 1993 च्या बॉंम्ब स्फोटाशी संबंधीत कथित आरोपीकडून एक प्रॉपर्टी खरेदी करुन मुंबईत दहशत माजवणा-यांना मदत केल्याच्या स्वरुपाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. पीएमएलए कायद्यातील कठोर तरतुदी पुर्वलक्ष्यी प्रभावाने लागू केल्याचे सांगितले जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रकाशझोत टाकतांना सन 1993 मधे मुंबईत बॉंम्बस्फोट घडवणा-या डॉन दाऊदची बहिण हसीना पारकरशी संबंधीत गुन्हेगाराकडून नवाब मलीक यांनी ही संपत्ती खरेदी करुन दहशतगर्दी करणारांना रसद पुरवल्याचा आरोप ठेवला जात आहे.
मुंबईच्या अंडरवर्ल्डमधे डॉन दाऊद आणि अरुण गवळी ही दोन मोठी नावे गाजताहेत. देशाबाहेर म्हणजे पाकिस्तानात राहून दाऊद त्याचे अंडरवर्ल्डचे विश्व चालवतो. इतिहासाची पाने चाळली तर दाऊदने तत्कालीन अनेक गुंडांचा किंवा दहशीत नाव कमावलेल्यांचा वापर करुन त्याचे साम्राज्य वाढवले. सन 1986 – 88 च्या सुमारास वसई विरार पट्ट्यात स्थानिक जनतेची लुट करणा-या उत्तर प्रदेशी गुंडांना आव्हान देणारी शक्ती म्हणून भाई ठाकुर उदयास आला होता. याच भाई ठाकुरच्या ताकदीचा वापर करुन दाऊदने अर्नाळा बंदरातील स्मगलिंगचा माल देशात पोचवण्याचा उद्योग केला. सन 1992 मधे मात्र बाबरी मशीद पाडली गेल्यानंतर देशात तयार झालेल्या नकारत्मक संतापजनक वातावरणात सन 1993 मधे 12 मार्चला आरडीएक्सचा वापर करुन बॉम्बस्फोट घडवण्यात दाऊद आणी त्याच्या हस्तकांनी सक्रीय भुमिका बजावल्याचा आरोप झाला. त्यावेळच्या दंगलग्रस्त वातावरणात शिवसैनिकांनी महत्वाची भुमिका बजावत बिथरलेल्या गुंडापासून जनतेला वाचवले असे आजही वारंवार सांगितले जाते. त्यामुळे शिवसेना ही मुंबईची तारणहार अशा भुमिकेत वावरल्याचे श्रेय म्हणून 1995 च्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसची सत्ता जाऊन सेना भाजप युती सत्तेवर आली. खरे तर त्याकाळी मुंबईच्या पोलिस खात्यातील सर्व प्रकारच्या अधिकारी – कर्मचा-यांनी मुंबई नियंत्रणात आणली. खरे तर स्वत:चा जीव धोक्यात घालून मुंबईतील त्याकाळची गुंडागर्दी रोखणा-या पोलिस दलाचे योगदान जनतेने मान्य करायला हवे. राजकीय लोक श्रेय घेतात तसे पोलिस खात्याला देखील श्रेय द्यायला हवे. मुंबई वाचवण्यासाठी शरद पवार केंद्रातून राज्यात परत आले होते हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
शिवसेना नेतृत्वाच्या सत्तेत लहान भाऊ असलेल्या भाजपचे तत्कालीन लढाऊ बाण्याचे मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी याच निवडणूकीपुर्वी आम्हाला सत्ता द्या – त्या दाऊदच्या मुसक्या बांधून आणू म्हणून गर्जना केली होती. स्वत: गृहमंत्री बनलेले मुंडे आणि त्यांचा पक्ष दाऊदच्या मुसक्या बांधून आणण्याची प्रतिज्ञा विसरले. त्यानंतर राज्यात व केंद्रात पुन्हा दोनवेळा भाजपची सत्ता आली. बाजपेयी नेतृत्वाच्या सत्तेत आघडी होती. बॉंम्बस्फोटानंतर देशाबाहेर पळून गेलेले गुन्हेगार पाकिस्तानासह अनेक देशात लपून बसले. परंतु गेल्या सुमारे तीस ते चाळीस वर्षात आंतर राष्ट्रीय दहशतखोरांना पकडून आणता आले नाही हे मात्र खरे! इंदीराजींच्या राजवटीपासून भारताला परकीय शक्तींचा धोका असल्याचा इशारा दिला जातोय. पण त्यांनी पंजाबातील उग्रवद्यांचे आंदोलन कणखरपणे दडपले. वेळ पडल्यानंतर त्यांचा जीवघेण्या हल्ल्यात मृत्यु झाला. नंतरचे पंतप्रधान राजीव गांधी यांनाही दहशतवाद्यांच्या कारवायात जावे लागले. दाऊद पासून किंबहुना त्याही आधीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरुन भारतात दहशतवाद माजवण्याचे डावपेच खेळले जाताहेत. देशांतर्गत राजकारणात मात्र त्याचे पडसाद उमटत राहतात. भारतात लोकशाही असल्याने दर पाच वर्षांनी निवडणूका होत असतात.
अमेरिकेने पाकिस्तानात जाऊन दहशतवादी ओसामा संपवला. तशा प्रवृत्ती संपवायच्या की त्याचेही निवडणूकीत भांडवल करुन वापरायचे? हा यक्षप्रश्न आहे. सुदैवाने आताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या आजवरच्या दोन वेळच्या सत्ता काळात विदेश यात्रा करुन आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची किर्ती वाढवली आहे. त्यांच्या शब्दाला मान दिला जातो. या विश्वासानेच ताज्या युक्रेन – रशिया युद्धात युक्रेनने भारताकडे म्हणजे मोदीजींकडे मदत मागितली आहे. देश आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या या घडामोडी थोड्या बाजुला ठेवल्या तरी महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने महाराष्ट्राची सत्ता तीन राजकीय पक्षांच्या हातात असल्याने राज्याचे प्रशासन हे सुशासन की भ्रष्ट? अशा पेचात जनता अडकल्याचे बोलले जाते. लोक तर आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या भुमिकेची त्यांच्या नजरेतून समिक्षा करु लागले आहेत. त्यांनाही सत्तेचे डावपेच कळू लागले आहेत.प्रवासाला निघण्यापुर्वी सकाळी सोबत बांधून नेलेली शिदोरी (भोजन) किती काळ वापरायची? मुंबई आम्हीच वाचवल्याचा दावा आणखी किती वर्ष करणारा? तेव्हा जीव वाचवल्याबद्दल आभार! त्या उपकाराची फेड म्हणून दोनदा सत्ता बहाल केली. राज्यात सत्ता बदल झाला तरी जनतेच्या सुख – समाधान – रोजगार – जीवनमानात आनंद निर्माण झाला का? सत्तेच्या साठमारीत अनेक राजकारण्यांची “घोडी गंगेत न्हाली”, जनतेचा फायदा काय? हा प्रश्न उरतोच!