पिंपरी : शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील डॉक्टरांना रविवारी शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार घडला होता. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आदेश मनपा प्रशासनाने दिले आहेत. याबाबत यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली आहे. या घटनेला चोवीस तास उलटले आहे मात्र पिंपरी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.
रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे रुग्णाच्या नातेवाइकांसोबत वॉर्ड क्रमांक ५०२ मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी तेथील डॉक्टरांसोबत वाद घालत शिविगाळ सुरु केली. सुरक्षारक्षकांनी डॉक्टरांशी वाद घालणा-या नगरसेवक व नातेवाइकांना वॉर्डातून बाहेर काढले. याबाबत सुरक्षा रक्षकांनी पिंपरी पोलिस स्टेशनला तक्रार अर्ज दिला. मात्र अद्याप नगरसेवक संदिप वाघेरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी सकाळी वायसीएममधील डॉक्टर आणि परिचारिकांनी या घटनेबाबत नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन देखील केले.
अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार यांनी रुग्णालयात भेट देऊन डॉक्टरांची समजूत काढली. रुग्णालय प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात एक बैठक झाली. त्यावेळी नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाला देण्यात आल्या. सुरक्षा रक्षकांनी तसा तक्रार अर्ज देखील पोलिसात दिला. मात्र अद्याप पिंपरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.