पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता प्रकाशच्या मनात!– संतापात दगड घातला त्याने मायाबाईच्या डोक्यात

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क):  मायाबाई आणि प्रकाश यांचा संसार अर्ध्यावर आला होता. त्यांच्या संसाराची जणू दुपार झाली होती. औरंगाबाद जिल्ह्याच्या सोयगाव तालुक्यातील मुखेड या गावी दोघे पती पत्नी रहात होते. मायाबाई चार मुलांची आई होती. तिच्या चारपैकी तिघा मुलांचे लग्न देखील झाले होते. संसाराचा भलामोठा पल्ला गाठल्यानंतर देखील मायाबाईचा पती प्रकाश तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. चारित्र्याच्या संशयातून तो मायाबाईला मारहाण व शिवीगाळ करत होता. प्रकाशला दारु पिण्याचे भारी व्यसन होते. दारुच्या आहारी गेलेला प्रकाश दारुचे पेग रिचवल्यानंतर मायाबाईला जास्तच त्रास देत होता.

पती प्रकाशच्या त्रासाला वैतागून मायाबाई आपल्या आईच्या घरी पाचोरा तालुक्यातील खाजोडा या गावी राहण्यास आली होती. मायाबाईची वयोवृद्ध आई भारताबाई एकटीच रहात होती. मायाबाई तिच्याकडे राहण्यास आल्याने दोघा मायलेकींना एकमेकींचा सहारा झाला. दोघी मोलमजुरी करुन सोबत राहू लागल्या. दोन वर्षाचा कालावधी लोटला. या कालावधीत मायाबाई तिच्या आईकडेच रहात होती. त्यामुळे प्रकाश तिच्या चारित्र्यावर जास्तच संशय घेऊ लागला. तिघा मुलांचे लग्न झाले व एकाचे लग्न बाकी असतांना मायाबाई आणी प्रकाश यांचा वाद संपुष्टात येण्याचे नावच घेत नव्हता. त्यामुळेच ती आईला सोडून पतीकडे येण्यास तयार होत नव्हती.

काही महिन्यापुर्वी मायाबाईचा पती, सासरा व त्याचा मुकादम असे तिघे जण मायाबाईची समजूत घालून तिला घेऊन जाण्यासाठी आले. यापुढे मायाबाईला त्रास दिला जाणार नाही असे आश्वासन प्रकाशने मायाबाईला दिले. मात्र यापुढे मायाबाईला त्रास दिला जाणार नाही असे तिच्या आईने वकीलामार्फत प्रकाशकडून लिहून घेतले. वेळ मारुन नेण्यासाठी प्रकाशने तसे लिहून दिले. त्यामुळे मायाबाई तिच्या पती व सास-यासोबत सासरी नांदण्यास गेली. मात्र घरी आल्यानंतर प्रकाशने आपल्या वागण्यात काही बदल केलाच नाही. दारु पिऊन आल्यानंतर तो मायाबाईला पुन्हा त्रास देऊ लागला. तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार पुन्हा सुरु झाला.

नव-याच्या त्रासाला वैतागून आणि पोटात दुखत असल्यामुळे ती प्रकाशला न सांगता चाळीसगावला पिर मुसा कादरी बाबाच्या दर्ग्यावर उपचारासाठी एकटीच निघून आली. वाटेत तिला तिची आई भेटली. तिची आई तिला पिर मुसा कादरी बाबाच्या दर्ग्यावर घेऊन आली. त्या ठिकाणी तिची नणंद सौ. सिंधुबाई भिल दोघींना भेटली. ती देखील तिच्या मुलीच्या उपचारासाठी गेल्या तिन महिन्यापासून दर्ग्यावर आली होती. तिच्यासोबत मायाबाई  व तिची  आईदेखील दर्ग्याच्या बाजुला पालाच्या झोपडीत मुक्कामाला थांबल्या. तेथेच झोपडीत राहून तेथील अन्नपदार्थ खाऊन सर्व जण रहात होत्या. 

काही न सांगता पत्नी घरातून गायब झाल्याचे बघून प्रकाश संतापला होता. त्याच्या मनात तिच्या चारित्र्याचे भुत पुन्हा संचार करु लागले. काही दिवसांपुर्वी दुस-याच्या मोबाईलवरुन मायाबाईने पतीला सांगितले की पोटात दुखत असल्यामुळे मी चाळीसगाव येथे दर्ग्यावर उपचारासाठी आली आहे. माझा इकडे तिकडे कुठेही शोध घेऊ नका. पत्नी मायाबाईचा ठावठिकाणा समजल्यानंतर प्रकाश अजुनच संतापला. संतापाच्या भरात तिला भेटण्यासाठी तो चाळीसगाव येथील पिर मुसा कादरी बाबाच्या दर्ग्यावर आला. 26 फेब्रुवारीच्या सकाळपासून तो दारुच्या नशेत मायाबाईला त्रास देऊ लागला. “तु मरते का मी मरु” असे म्हणत त्याने दारुच्या नशेत शिवीगाळ करत दिवसभर तिला त्रास दिला. या भांडणामुळे तिच्यासह तिची आई व नणंद असे सर्वजण वैतागले.

Dipak Birari (Asstt. police inspector)

26 फेब्रुवारीच्या रात्री सर्व जण जेवण करुन झोपडीच्या बाहेर गोधड्या टाकून झोपले होते. रात्री बारा वाजेच्या दरम्यान अचानक मायाबाईच्या किंचाळण्याचा आवाज तिच्या आईला आला. त्यामुळे मायाबाईची आई व नणंद अशा दोघी जणी झोपेतून लागलीच उठल्या. मायाबाईच्या नाका तोंडातून रक्त वहात असल्याचे त्यांना दिसले. जवळच एक भला मोठा दगड देखील पडलेला होता. दोघींना बघून प्रकाशने तेथून पलायन केले. आरडाओरड करुन दोघींनी त्याचा पकडण्यासाठी पाठलाग केला. मात्र तो पलायन करण्यात यशस्वी झाला. मायाबाईवर तिचा पती प्रकाशनेच हल्ला केल्याचे तिच्या आईला कळून चुकले होते. या घटनेची माहिती देण्यासाठी तिने चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन गाठले. माहिती दिल्यानंतर ती तातडीने दर्ग्यावर परत आली. तिच्या पाठोपाठ लागलीच पोलिस आणि रुग्णवाहिका दाखल झाली. जखमी मायाबाईला रुग्णवाहिकेतून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले गेले. मायाबाई मोठ्या प्रमाणात जखमी झालेली होती. डॉक्टरांनी तिच्या डोक्यावरील जखमेवर पट्टी बांधून पुढील उपचारासाठी धुळे येथे घेऊन जाण्यास सांगितले. त्याच रुग्णवाहिकेतून जखमी मायाबाईला धुळे येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मायाबाईचा मृत्यु झाला. प्रकाश उर्फ भुरा रामदास सोनवणे (रा. मुखेड ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद) याने त्याची पत्नी मायाबाईच्या डोक्यात दगड टाकून हत्या केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर  पोलिस स्टेशनला खूनाचा  गुन्हा  दाखल  करण्यात आला.  सदर गुन्हा भारताबाई विक्रम गायकवाड हिने दिलेल्या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र.न. 85/22 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला.   या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दिपक बिरारी यांच्याकडे देण्यात आला. स.पो.नि. दिपक बिरारी यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने फरार संशयीत आरोपी प्रकाश सोनवणे यास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here