वाळूज : चौदा महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने सासरच्या त्रासाला वैतागून शेतातील विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. प्रांजली अक्षय शिंदे (22) असे आत्महत्या करणा-या विवाहितेचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी औरंगपूर (हर्सुली, ता. गंगापूर) परिसरात उघडकीस आलेल्या या घटनेप्रकरणी विवाहीतेच्या वडीलांनी अक्षय तात्याराव शिंदे (पती), तात्याराव शिंदे (सासरा), कमलबाई शिंदे (सासू) सर्व रा. हल्ली मुक्काम अविनाश कॉलनी वाळूज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पतीला अटक करण्यात आली आहे.
शेती खरेदी करण्यासाठी माहेरुन सात लाख रुपये घेऊन येण्यासाठी प्रांजलीचा छळ सुरु असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. आठ दिवसात पैशांची तजवीज करतो असे सांगून प्रांजलीला सासरी रवाना करण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळातच तिने आत्महत्येचा मार्ग स्विकारला.