जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या रावेर या तालुक्याच्या गावी विवाहितेची घराला कुलुप असलेल्या बंद घरात हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयत विवाहितेचा मुलगा कुलूप उघडून घरात आल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. डोक्यात लाकडी पाटी मारल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.
आज दुपारी उटखेडा रस्त्यावरील सप्तशृंगी कॉलनीत उघडकीस आलेल्या या घटनेने रावेर शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे. सुनिता संजय महाजन (46) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह पोलिस उपनिरिक्षक मनोहर जाधव, विशाल सोनवणे, सचिन नवले, विजू जावरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या पतीला चौकशीकामी ताब्यात घेतले असल्याचे समजते.