जळगाव : कर्जबाजारी झालेल्या शेतकरी पुत्राने आपले कर्ज कमी करण्याच्या नादात अफूची लागवड केली. मात्र हाती आलेले पिक बाजारात जाण्यापुर्वीच त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या. चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत वाळकी येथील प्रकाश सुदाम पाटील असे या तरुणाचे नाव आहे.
अफूच्या शेतीची लागवड कशी करतात, त्याचे पिक कसे तयार होते याबाबतीत प्रकाश पाटील याने यु ट्युबवर पाहिले होते. त्यातून त्याला अफूची शेती करण्याची कल्पना सुचली. या माध्यमातून कमी कालावधीत अधिक पैसे मिळतील अशी त्याला आशा होती. मात्र पोलिस कारवाईमुळे त्याच्या पदरी निराशा आली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक देवीदास कुनगर यांच्यासह त्यांच्या सहका-यांना त्यांनी कारवाईचे आदेश व सुचना दिल्या. पोलिसांच्या ताब्यातील शेतकरी आरोपी प्रकाश पाटील याने तिन एकर शेतात डिसेंबर महिन्यात साधारण चार किलो अफूची पेरणी केली होती. कुणाला संशय येऊ नये म्हणून त्याने आजुबाजुला मक्याची देखील लागवड केली होती. अफू पिकाची लागवड पुर्ण झाल्यानंतर ते आता बाजारात विक्रीला जाण्याच्या बेतात होते. मात्र त्यापुर्वीच त्याला पोलिस कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पिक पंचनामा सुरु होता.