मुंबई : कोरोना (कोवीड-१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व नागरीकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर शासनाने अनिवार्य केला आहे. यासाठी बाजारात मास्कच्या मागणीत कमालीची वाढ झाली आहे. या मागणीचा गैरफायदा काही भामटे घेत आहेत.
नामांकित व्हिनस कंपनीचे बनावट मास्क विक्री होत असल्याच्या तक्रारी गुन्हे शाखा, कक्ष ३ चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्याकडे आल्या होत्या. या प्रकरणी मिळालेल्या गुप्त माहितीची शहानिशा करण्यासाठी पो.नि. नितिन पाटील प्रयत्नशिल होते. दिनांक २८/०७/२०२० रोजी लोअर परेल पूर्व परिसरात एक इसम व्हिनस कंपनीच्या बनावट मास्कची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती पो.नि. नितीन पाटील यांना मिळाली होती.
त्या अनुशंगाने व्हिनस कंपनीच्या अधिका-यांसह कक्षातील अधिकारी व अंमलदार यांनी पोदार मिल कम्पाऊंड जवळ, लोअर परेल, पूर्व मुंबई याठिकाणी सापळा लावला. याठिकाणी एका टेम्पोतून आलेल्या इसमास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातील टेम्पोच्या झडती घेतली असता त्यात व्हिनस कंपनीचे पांढऱ्या रंगाचे N 95 मास्क (१०,५०० नग), वॉल्व असलेले पिवळ्या रंगाचे V-410 V मास्क (६,८00 नग) व V-410 V याचे प्लास्टिकचे रिकामे पाऊच (१०,000 नग) अशी एकूण रु.२१,३९,000/- ची मालमत्ता मिळून आली.व्हिनस (VENUS) कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जप्त मास्कची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
जप्त करण्यात आलेले N 95 मास्क निकृष्ट दर्जाचे असून ते नामांकित VENUS कंपनीच्या नावाने बनावट करुन स्वत:च्या आर्थिक फायदयाकरीता जास्त दराने काळया बाजारात विक्री करण्याकरीता आणल्याचे आढळून आले. हे निकृष्ट दर्जाचे बनावट N 95 मास्क खरे म्हणून नागरीकांनी अथवा आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचारी/अधिकारी यांनी वापरले तर त्यांना कोरोना रोगाची लागण होवून रोगाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सदर बनावट मास्कच्या वापरामुळे मानवी आरोग्यास धोका होण्याची शक्यता असल्याचे दिसून येते. याबाबत VENUS कंपनीच्या अधिका-यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु.प्र.शा., गु.र.न.११४/२०२० भा.द.वि. ४२०, ३३६ सह ५१,६३,६५ कॉपीराईट अॅक्ट सह कलम १०२, १०३, १०४ ट्रेड मार्क अॅक्ट (ना.म.जोशी मार्ग पो.ठाणे गु.र.न.२७६/२०२०) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपीस अटक करण्यात आली आहे. अटकेतील आरोपीस ३ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हयाचा तपास गुन्हे शाखा, कक्ष ३ मार्फत करण्यात येत आहे. अशाप्रकारचे बनावट मास्क कोठे बनविले व कोठे विक्री केली आहे याचा तपास करण्याकरीता पथक पाठविण्यात येत आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री.अकबर पठाण, सहाय्यक पो.आयुक्त, प्रकटीकरण-मध्य श्री.राजेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्ष ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोनि नितीन पाटील, सपोनि गजानन भारती, सपोनि सोनाली भारते, पोउनि मोहसिन पठाण, पोउनि नवनाथ उघडे, सफौ.रमेश गावित, पो.ह.संजय सावंत, गणेश गोरेगांवकर, विकास जाधव, पो.ना. शिवाजी जाधव, आकाश मांगले, संजय नागवेकर, दिपक कोळी, संजय शेळके, पो.शि.राहुल अनभुले, वैभव बिडवे , मंगेश शिंदे , भास्कर गायकवाड, प्रमोद सकपाळ, पो.शि.चालक गोडसे यांनी केली आहे.