सोलापूर : लाचेची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर येथील स.पो.नि. दिनेश कुलकर्णी एसीबीच्या सापळ्यात मंगळवारी अडकले. सध्या ते अटकेत आहेत. एका गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स.पो.नि. कुलकर्णी यांनी मागितल्याचे एसीबीच्या कारवाईत उघड झाले. तडजोडीअंती पन्नास हजार देण्या घेण्याचे ठरले. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एसीबीचे डिवायएसपी संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली.
31 जानेवारी रोजी एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारदाराच्या नातेवाईकांवर जोडभावी पोलिस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तक्रारदारास त्याच्या पत्नीसह सासू, मेहुणा, मेहुणी व साडू अशा सर्वांना आरोपी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. या सर्वांना आरोपी करायचे नसल्यास एक लाख रुपये लाचेची मागणी स.पो.नि. कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आली होती. घासाघीस केल्यानंतर पन्नास हजारात व्यवहार ठरला होता. लाचेची मागणी सिद्ध झाल्यामुळे स.पो.नि. दिनेश कुलकर्णी यांच्याविरुद्ध जोडभावी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.