धुळे : धुळे शहरातील मनोहर टॉकीज परिसरातील एका व्यापारी संकुलानजीक पोलिस कर्मचा-याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. गोविंद दगा पारधी असे मयत स्थितीत आढळून आलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. ते आझाद नगर पोलिस स्टेशनला कार्यरत होते.
घटनेची माहिती समजताच धुळे शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. नितीन देशमुख यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरु केली. या घटनेप्रकरणी सुरुवातीला धुळे शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी गोविंद पारधी यांचे शव उत्तरीय तपासणीकामी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. शव चिकित्सेनंतर त्याच्या मृत्यूचे कारण समजणार असून पुढील तपास धुळे शहर पोलिस स्टेशनचे पो. नि. नितीन देशमुख व त्यांचे सहकारी करत आहेत.