जळगाव : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढत्या चो-या, घरफोड्या, पशुधन चो-यांच्या घटना लक्षात घेत पोलिस अधिक्षकांनी गावागावात ग्राम संरक्षण पथक निर्मितीचे आदेश पोलिस अधिका-यांना दिले आहेत. त्या आदेशाला अनुसरुन अमळनेर तालुक्यातील मंगरुळ, शिरुड, जानवे, कावपिंप्री, वाघोदा, रणाईचे, चोपडाई, कोंढावळ, चिमणपुरी, पिंपळे खुर्द, पिंपळे बुद्रुक अशा बारा गावात ग्राम संरक्षण पथकाची निर्मीती करण्यात आली.
या उपक्रमाच्या अंतर्गत उप विभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बारा गावांची बैठक पोलिस स्टेशनला बोलावण्यात आली. या गावातील उपस्थित गावक-यांना लाठी, शिटी व ओळखपत्र देण्यात आले. प्रत्येक गावात चार ग्राम रक्षक दररोज रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत गस्त घालणार आहेत. आजुबाजुच्या चार गावांचा मिळून एक व्हाटसअॅप गृप तयार केला जाणार असून त्यामाध्यमातून सर्व ग्रामरक्षक एकमेकांसोबत संवाद साधणार आहेत. या व्हाटसअॅप गृपमधे सर्व संबंधित पोलिस अधिकारी, बिट अंमलदार, पोलिस पाटील, चालक व गावातील प्रतिष्ठीत नागरिक राहणार आहेत. पशुधन चो-या, इलेक्ट्रीक मोटारींच्या चो-या, ठिबक नळ्यांच्या चो-या, इतर अवजारे, मोटार सायकल चो-या आदी गैरप्रकारांना या माध्यमातून आळा बसण्यास मदत होणार आहे.
याप्रसंगी अमळनेर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जयपाल हिरे, गोपनिय अंमलदार डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिद्धार्थ सिसोदे, तालुक्यातील सर्व गावांचे पोलिस पाटील, सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, यांच्यासह जानवे जवखेडा बीटचे अधिकारी पोलिस उप निरीक्षक गंभीर शिंदे, अंमलदार कैलास शिंदे, हितेश चिंचोरे, जनार्दन पाटील, भुषण पाटील, योगेश महाजन आदी उपस्थित होते.