वयोवृद्धांना लुटणारा टिपू पोलिसांच्या तावडीत

On: March 11, 2022 8:09 PM

जळगाव : वयोवृध्द इसमांना गाठून त्यांचेशी गोड बोलून, त्यांना गाडीवर बसवून त्यांच्याकडील पैसे व सोन्याचे दागिने जबरी हिसकावण्याचे गुन्हे जळगाव शहर व जिल्ह्यात अज्ञात इसमांविरुद्ध दाखल झाले होते. जळगाव शहर व जिल्ह्यात वयोवृद्धांची लुट करणा-या आरोपीस एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. इब्राहीम उर्फ टीपू सत्तार मन्यार (30) रा. बाहेरपुरा वराडसिम ता. भुसावळ असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. तो सध्या एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने एमआयडीसी, फैजपूर व शनीपेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी पोलिस नाईक विकास मारोती सातदिवे, सुधिर संजय साळवे, हेमंत रघुनाथ कळसकर आदींचे विशेष पथक तयार केले होते. सदर पथक गेल्या दोन महीन्यापासून या गुन्ह्यातील आरोपीतांची माहीती काढत होते. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलची तसेच ज्या ज्या परिसरात अशा स्वरुपाचे गुन्हे घडले आहेत त्या त्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती संकलीत करण्याचे काम गेल्या दोन ते तिन महिन्यापासून सुरु होते.तपासादरम्यान इब्राहिम उर्फ टीपू सत्तार मन्यार (30) हा भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील आरोपी या गुन्ह्यात सामील असल्याची गोपनीय माहिती पुढे आली. या आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहीली असता त्याने यापुर्वी अडावद पोलिस स्टेशन हद्दीत सन 2019 मधे अशाच स्वरुपाचा जेष्ठ नागरिकास लुटण्याचा गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले. संकलीत केलेली माहिती, खब-यांनी दिलेली माहिती व अडावद पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशा सर्व माहितीचा मेळ बसवून आरोपीचा माग काढण्याचे काम वेगाने सुरु करण्यात आले.

पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. मिलींद सोनवणे, पोलिस नाईक गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, पोलिस नाईक हेमंत कलसकर, सुधीर साळवे, इमरान सैय्यद, योगेश बारी, सचिन पाटील, पो.कॉ. चंद्रकांत पाटील, मुख्यालय कर्मचारी पो.कॉ. मुबारक तडवी आदींनी इब्राहीम उर्फ टीपू याला ताब्यात घेण्याकामी वराडसिम गाठले. वराडसिम गावातील बाहेरपुरा भागातून त्याला शिताफीने सापळा रचून उचलण्यात आले. त्याची खास पद्धतीने विचारपूस केली असता त्याने एमआयडीसी, फैजपूर व शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यांची कुंडली कथन केली.

अरुण गिरधर धांडे (63) रणछोडदास नगर जळगाव हे दिनांक 31 फेब्रुवारी 2022 रोजी कामानिमीत्त बँकेत आले होते. अज्ञात इसमाने जळगाव शहरातील पांडे चौकात आरोपी इब्राहीम उर्फ टीपू याने त्यांना गाठले. “बाबा कुठे चालले, तुम्हाला सोडून देतो” असे म्हणत त्याने धांडे यांना मोटारसायकलवर बसवले. वाटेत रामदवे बाबा मंदीराजवळ मोटारसायकल थांबवून गोड बोलून त्यांच्या बोटात असलेल्या अंगठीसारखी अंगठी आपल्याला तयार करायची आहे असे सांगून त्यांची अंगठी बघण्याच्या बहाण्याने काढून घेत पलायन केले होते. सदर अंगठी 24 हजार रुपये किमतीची 8 ग्रॅम वजनाची होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुस-या घटनेत भास्कर विठठल लाडवंजारी (रा. हनुमान मंदीराजवळ, मेहरुण – जळगाव) हे 11 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास महादेव मंदीर मेहरुण कडून पायी जात होते. त्यावेळी एका इसमाने त्यांना मोटारसायकल वर गोड बोलून सोडून देण्याच्या बहाण्याने बसवून घेतले. वाटेत त्यांना धमकावत बळजबरीने त्यांचा खिशातील 9500 रुपये जबरीने हिसकावून घेण्यात आले होते. तिस-या घटनेत गणपत नेमाडे (76) रा. आराधाना कॉलनी फैजपुर हे दिनांक 23 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास पोस्टातील 99 हजार 900 रुपये काढून घरी जात होते. दरम्यान फैजपुर शहरात बाहेरपेठ भागात एक इसम मोटार सायकलवर त्यांच्याजवळ आला. घरी सोडून देतो असे म्हणत त्याने त्यांना डबलसीट बसवले. गोड बोलून त्यांच्याजवळ असलेली रोकड दोन दिवसात परत करतो असे म्हणत घेऊन गेला व पसार झाला. या फसवणूकीबद्दल फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौथ्या घटनेत अरुण बळीराम भोळे (72), रा. नंदनवन कॉलनी जळगाव हे 28 फेब्रुवारी रोजी दुपारी जळगाव शहरातील कोबंडी बाजार नजीक युवराज हॉटेल जवळ असतांना एका इसम त्यांच्याजवळ आला. मी तुम्हाला ओळखतो असे सांगुन त्याने हॉटेल समोर लावलेली कार त्यांना दाखवली. ही कार मला घ्यायची आहे व कारचा मालक चाबी घेवून येत आहे असे सांगून दोन हजार रुपयांचे सुटे मागितले. दरम्यान कार घेण्याच्या बहाण्याने अरुण भोळे यांच्याकडील 46 हजार रुपये चोरुन नेले होते. याप्रकरणी शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल अंगठी हिसकावल्याच्या गुन्ह्यात आरोपी इब्राहीम उर्फ टिपू यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून अजून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याची सखोल चौकशी सुरु आहे. न्या. ए. एस. शेख यांचा न्यायलयात त्याला आज हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. विकास सातदिवे, सुधिर साळवे, हेमंत कळसकर यांनी गोपनिय माहीती काढून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकात गवळी यांनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment