कल्याण : टिटवाळा स्टेशनपासून अंदाजे बारा किलोमीटर अंतरावरील आपटीबारी गावात संशयातून भाच्याने मामीची हत्या केल्याची घटना घडली आहे. गुलाबबाई मारवत वाघे (45) असे मयत महिलेचे नाव आहे. गुलाबबाईला ठार मारून फरार झालेला संशयखोर खूनी मोहन चंदर वाघे (28) यास कल्याण तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे. मयत गुलाबबाईचा मुलगा गणपत मारवत वाघे (21) याने दिलेल्या जवाबानुसार कल्याण तालुका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशिक्षित वाघे परिवारातील मोहन वाघे याच्या पत्नीचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला होता. त्याची मामी गुलाबबाई हिने काहीतरी केले म्हणूनच आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा मोहन याने समज केला होता. गेल्या काही दिवसांपासून संशयाचे भूत त्याच्या मानगुटीवर बसले होते. मोहनच्या मनात गुलाबबाईचा काटा काढण्याचा विचार घोळत होता. सायंकाळी सातच्या सुमारास गुलाबबाई अंगणात बसली होती. त्यावेळी मोहन तेथे आला.
तूच काहीतरी केलेस म्हणून माझी बायको मेली, असा आरोप त्याने त्याची मामी गुलाबबाईवर केला. गुलाबबाईने त्याचे आरोप फेटाळले. त्यामुळे दोघात वाद वाढत गेला. त्यामुळे आजुबाजुचे लोक जमा झाले. संशयखोर मोहनने घरातून लोखंडी सुरा आणला व मामीवरच घाव घातले. गुलाबबाईचा काहीवेळातच मृत्यू झाला. मामीचा मृत्यू होताच मोहन तेथुन पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप गोडबोले, पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे आदी घटनास्थळी हजर झाले. मयत गुलाबबाईचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आला. फरार मोहन वाघे यास अटक करण्यात आली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पो.नि. संतोष दराडे करत आहेत.