औरंगाबाद : दहावीची परिक्षा देण्यासाठी बहिस्थ विद्यार्थ्याला हॉल तिकीट देण्याच्या बदल्यात दहा हजार रुपयांची लाच स्विकारणा-या संस्थाचालकास एसीबीच्या पथकाने 14 मार्च रोजी अटक केली आहे. आज 15 मार्च रोजी लाचखोर संस्थाचालकास न्यायायलयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. कलावती चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे चालक संपत पाराजी जवळकर असे लाच घेणा-या संस्थाचालकाचे नाव आहे. सविता खामगावकर या महिला लिपीकेचा देखील या लाचखोरीत सहभाग असल्याचे आढळून आले आहे. या लिपिकेविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया राबवण्याचे काम काल सुरु होते.
एका बहिस्थ विद्यार्थ्याने दहावीची परिक्षा देण्यासाठी 16 क्रमांकाचा फॉर्म भरला होता. त्या विद्यार्थ्याला हॉल तिकीट देण्यासह परिक्षेत मदतीची गरज होती. याकामी शाळेतील लिपिका सविता खामगावकर यांनी त्याच्याकडे सुरुवातीला तिस हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र घासाघीस केल्यानंतर 15 हजार रुपयात व्यवहार निश्चित झाला. त्यानंतर विद्यार्थ्याने लागलीच एसीबीकडे धाव घेत तक्रार केली.
गारखेडा परिसरातील ज्ञानप्रकाश विद्या मंदिर या जवळकर संचालक असलेल्या शाळेत त्यांनी संबंधीत विद्यार्थ्याकडून दहा हजाराचा हप्ता स्विकारला. त्यानंतर ते तातडीने उल्का नगरीतील आपल्या निवासस्थानी गेले. त्यांच्या पाठोपाठ एसीबीचे अधिकारी गेले व त्यांना ताब्यात घेतले. एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपाली निकम-भामरे, अंमलदार सुनील पाटील, बाळासाहेब राठोड, सी. एन. बागूल यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.